Beed : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील आरणविहरा येथे एका ग्रामरोजगार सेवकाने लोकनियुक्त महिला सरपंचाला सार्वजनिक ठिकाणी अश्लील भाषेत शिवीगाळ करत त्यांच्या चारित्र्यावर गंभीर आरोप केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (Beed) या प्रकारामुळे संबंधित ग्रामरोजगार सेवकाच्या निलंबनाची मागणी जोर धरू लागली आहे. याप्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
आरणविहरा गावाच्या सरपंच यांचे पती अण्णा शिरसाठ हे १३ ऑगस्ट रोजी गावातील काही नागरिकांसोबत विकासकामांवर चर्चा करत होते. यावेळी गावातील ग्रामरोजगार सेवक राजू रघुनाथ रामगुडे याने चर्चेत हस्तक्षेप करत महिला सरपंचावर बिनबुडाचे आरोप करण्यास सुरुवात केली. बोलता-बोलता रामगुडे याचा तोल सुटला आणि त्याने सरपंचांना उद्देशून अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ केली. यावेळी दुसऱ्या एका व्यक्तीनेही ‘सरपंच नालायक आहे, आम्ही बोलणारच,’ असं म्हणत उद्धट वर्तन केलं.
बीडमधील आष्टी तालुक्यातील धक्कादायक घटना; नवजात बाळ घरातच सोडलं अन्
महिला सरपंच गावात उपस्थित नसताना त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याच्या या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. एका लोकप्रतिनिधी महिलेसोबत सार्वजनिक ठिकाणी असं असभ्य वर्तन करणं चुकीचे असून, या मुजोर कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या घटनेमुळे गावातील वातावरण ढवळून निघालं आहे.
येत्या दोन दिवसांत ग्रामरोजगार सेवक राजू रामगुडे याला निलंबित केलं नाही, तर आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांसह तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसू, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. या प्रकरणामुळे आता प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. एका शासकीय कर्मचाऱ्याने लोकशाही मार्गाने निवडलेल्या महिला लोकप्रतिनिधीचा केलेला अपमान सहन केला जाणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.