कामांचे दहा लाखांचे तुकडे अन् पुन्हा एकदा बीडच्या नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षांत घमासान !

Beed NagarPalika-सत्ताधारी गटातीलच उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, फारुक पटेल, अमर नाईकवाडे यांच्या पुढाकाराने 11 नगरसेवकांचा स्वतंत्र गट.

Beed Nagarpalika

Beed Nagarpalika

दत्ता देशमुख
Beed NagarPalika : बीड नगरपालिकेत (Beed NagarPalika) सत्तांरानंतर सुरुवातीच्या काही सर्वसाधारण सभा सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या गटनेत्या व नगरसेवकांच्या आरोप-प्रत्यारोप आणि भाषणांनी गाजल्या. पण आता सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस दोन गट झाल्याने त्यांच्यातील एकमेकांवरील कुरघोड्यांनी बीडकरांची करमणूक होत आहे. मात्र, याचा विकासकामांवरही परिणाम होण्याची भिती निर्माण झाली आहे. बुधवारी झालेली विशेष सभाही सत्ताधाऱ्यांतच जुंपली. कारण होते, पाणीपुरवठा विभागामार्फत हाती घेतलेल्या साडेतीन कोटी रुपयांच्या विकासकामांचे 10 लाख रुपयांचे तुकडे करण्याचे. नगराध्यक्षा प्रेमलता पारवे यांनी उपनगराध्यक्षांना थेट ‘खाली बसा’ असे सुनावले. यावरून शेवटच्या टप्प्यात सभा चांगलीच वादळी झाली.

पूर्वी बीड नगरपालिकेत एकहाती सत्ता असल्याने सर्वसाधारण सभा, विषय समित्यांच्या बैठका आणि त्यामध्ये होणारे निर्णयही एकहाती होते. आता नगरपालिकेत सत्ताधाऱ्यांचेच दोन गट आणि दोन प्रमुख विरोधी पक्ष. त्यात सर्वसाधारण सभा आणि विशेष सभांचाही धडाका आणि बैठकांचे लाईव्ह प्रसारण असल्याने नगरसेवकांनाही मुद्दे मांडण्याचा फिल अधिकच येत आहे. सुरुवातीच्या काही सभा विरोधी गटाच्या नेत्या डॉ. सारिका क्षीरसागर व सत्ता पक्षातील उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, गटनेते फारुक पटेल, अमर नाईकवाडे, अॅड. महेश धांडे यांच्यातील आरोप -प्रत्यारोपाने गाजल्या. डॉ. क्षीरसागरांच्या आरोप आणि हरकतींवर ही मंडळी मागच्या सत्ता काळातील कामांच्या आठवणी देतात. मात्र, मागच्या महिनाभरापासून नगरपालिकेतील राजकीय परिस्थिती बदलली. सत्ताधारी गटातीलच उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, फारुक पटेल, अमर नाईकवाडे यांच्या पुढाकाराने 11 नगरसेवकांनी स्वतंत्र गट तयार केला आणि सत्ताधारी गटातील नगराध्यक्ष व सभापतींच्या विरोधात वॉर सुरु केले. त्याचा प्रत्यय नगरपालिकेला 15 व्या वित्त आयोगातून भेटलेल्या 45 कोटी रुपयांतून हाती घ्यावयाच्या घनकचरा व्यवस्थाापन, पाणी पुरवठ्यातून करावयाच्या कामांच्या अनुषंगाने झालेल्या विशेष सर्वसाधारण बैठकीत आला.

सकाळी 11 : 30 वाजता सुरु झालेली बैठक साडेसहा वाजेपर्यंत चालली. सुरुवातीला कुल वातावरणात चर्चा होत असताना घनकचरा प्रकल्पाचा मुद्दा मार्गी लागला. विरोधी गटानेही नाळवंडी नाका भागात प्रकल्प उभारणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. हा मुद्दा स्वच्छता सभापती शेख निजाम यांच्या खात्याशी संबंधीत होता. पण, शेवटच्या टप्प्यात बंड पुकारलेल्या उपनगराध्यक्ष विनोद मुळूक यांच्या पाणी पुरवठा विभागातील संबंधीत कामांचा मुद्दा आला. साधारण तीन ते साडेतीन कोटी रुपयांचा निधी खर्च करुन हाती घेतलेल्या विकास कामांचे 10 – 10 लाख रुपयांचे तुकडे पाडायचे आणि ही कामे मजूर सहकारी संस्था किंवा सुशिक्षीत बेरोजगार संस्थांना देण्याबाबतचा ठरावा मागच्या बैठकीत संमतही झाला होता.

परंतु, नगराध्यक्षांनी दिवंगत अजित पवार यांनी घालून दिलेल्या नियमाची मेख मारत या मुद्द्याला नकार दिला. विकासकामे दर्जेदार होण्यासाठी कामांचे तुकडे पाडायचे नाहीत आणि एकत्रित टेंडर करण्याची प्रथा वजा नियम दिवंगत पवारांनी घालून दिलेला असल्याने याबाबत आपल्याला जिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मागवावे लागेल, असे अध्यक्षा प्रेमलता पारवे म्हणाल्या. यावरुन मग ही खडाजंगी सुरु झाली आणि नगराध्यक्षांनी उपाध्यक्षांना थेट जमत नसेल तर खाली बसा असे सांगीतले. यावरुन ते संतप्त होत आपले पद संवैधानिक असून तुम्ही असे कसे म्हणू शकता, तुम्ही मुरुमाबाबत घेतलेला निर्णय बेकायदा असल्याचे असे प्रत्युत्तर दिल्यानंतर पारवे यांनी आपण पिठासिन अधिकारी असताना मागच्या बैठकीत आपल्यावर आरोप कसे, असे सुनावले.

या खडाजंगीत फारुक पटेल, यांनी ही सभा अख्खे शहर बघत असल्याचे सांगत हस्तक्षेप केला. तर अमर नाईकवाडे यांनीही यात भाग घेतला. विरोधी गटाच्या नेत्या डॉ. सारिका क्षीरसागर यांनी आम्ही विरोधक असताना विकासकामांना सकारात्मक पाठिंबा देत आहोत आणि तुमच्यातीलच ‘दुजाभाव’ विकासाला मारक असल्याचे सांगितले. एकूणच बीडच्या नगरपालिका राजकारणात वादळी सभा, अभ्यासपूर्ण चर्चा आणि आरोप होत असले तरी ‘लाईव्ह’मुळे बीडकरांची करमणूक होत आहे. पण, या ओढाताणीमुळे विकासकामांना खिळ बसण्याची भितीही बीडकरांच्या मनात निर्माण होत आहे.

Exit mobile version