Massajog Sarpanch Election Result :बीड जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या मस्साजोग ग्रामपंचायत सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल लागला आहे. दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव करत स्वरूपानंद देशमुख तब्बल 92 मतांनी विजयी झाले आहेत. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर याठिकाणी पोटनिवडणूक लागली होती. अश्विनी देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख यांच्यात थेट लढत झाली होती. एक भावनिक वातावरण या निवडणुकीत पाहायला मिळाले. मात्र मतदारांनी अखेर स्वरूपानंद देशमुख यांना पसंती दिली आहे. मस्साजोगच्या निवडणुकीत स्वरुपानंद देशमुख यांचा 92 मतांनी विजय झाला आहे.
केज तालुक्यातील मस्साजोगचे तत्कालीन सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येनंतर सरपंचपद रिक्त झाले होते. मस्साजोगच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची अपेक्षा होती. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पाच उमेदवारांपैकी संजिवनी देशमुख, पंजाब देशमुख आणि करुणा देशमुख या तीन उमेदवारांनीच आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तर, मागील सरपंचपदाच्या निवडणुकीत 9 मतांनी पराभूत होणारे स्वरूपानंद देशमुख यांनी आपला अर्ज कायम ठेवला होता.
या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, आपल्या वडिलांच्या न्यायाची लढाई लढणाऱ्या वैभवी देशमुख हिने भाऊ विराज देशमुख याच्यासोबत आई अश्विनी देशमुख यांच्यासाठी प्रचार केला. याच प्रचारादरम्यान गावकरी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. 28 एप्रिल रोजी मतदानानंतर आज दि. 29 एप्रिल रोजी मतमोजणीत स्वरूपानंद देशमुख यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्यावेळीच स्वरूपानंद देशमुख यांनी अश्विनी यांना निवडणूक न लढण्याचा सल्ला दिला होता. निवडणूक लढविण्यापेक्षा पतीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत रहा, असे देशमुख म्हणाले होते.
भावनिक मुद्द्यांवर रंगलेल्या या निवडणुकीत अखेर गावकऱ्यांनी विकासाच्या मुद्द्याला कौल दिल्याचे चित्र दिसून आले. मागील निवडणुकीत अवघ्या 9 मतांनी पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख यावेळी मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. बिनविरोध निवडणुकीचे प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर झालेल्या या लढतीत अखेर मस्साजोगकरांनी स्वरूपानंद देशमुख यांच्या बाजूने कौल देत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
