Minister Chhagan Bhujbal comments on his long political journey : मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या दीर्घ राजकीय प्रवासावर भाष्य करताना सध्याच्या राजकीय घडामोडींवर देखील ठाम आणि स्पष्ट भूमिका मांडली आहे. आपण बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राजकारणात काम केले असून, त्यांनीच आपल्यावर विश्वास दाखवून महापौरपदाची जबाबदारी दिली होती, असे भुजबळ यांनी सांगितले. शिवसेनेत असताना आपण दोन वेळा महापौर राहिलो असून त्याच काळात आमदार म्हणून देखील काम केले, याची आठवण त्यांनी करून दिली. राजकारण हे कायमस्वरूपी नसून ते सतत बदलत असते, असे सांगत भुजबळ म्हणाले की, मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री बदलत असतील, तर महापौर बदलणे ही काही नवीन किंवा असामान्य बाब नाही. बदल हीच राजकारणाची खरी ओळख आहे आणि त्याकडे परिपक्वतेने पहिले पाहिजे, असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत घडामोडींवर बोलताना भुजबळ यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या चर्चेला दुजोरा दिला आहे. सोमवारी आणि मंगळवारी सुनेत्रा पवार या मुंबईत येणार असून, त्यांनीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारावी, अशी पक्षातील सर्वसाधारण भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, पक्षातील महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचाही सुनेत्रा पवार यांना भक्कम पाठिंबा असल्याचा दावा भुजबळ यांनी केला.
मुंबईत मध्यरात्री ‘गेम’; शरद पवारांच्या एकमेव शिलेदाराने ठाकरेंची साथ सोडल्याने महापालिकेत ‘मविआ’चे अस्तित्व संपणार का?
पक्षातील निर्णयप्रक्रियेबाबत स्पष्टीकरण देताना भुजबळ म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणताही निर्णय हा एका व्यक्तीचा नसून तो सामूहिक पातळीवर घेतला जातो. उपमुख्यमंत्रीपद आणि पक्षनेतेपद देण्याचा निर्णय देखील संपूर्ण पक्षाने चर्चा करून घेतला आहे. त्यामुळे या विषयावर वारंवार प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही, अशी स्पष्ट नाराजी देखील यावेळी त्यांनी व्यक्त केली.
राजकीय स्थेर्य, संघटनात्मक एकजूट आणि सामूहिक निर्णय या तत्वांवरच पक्ष पुढे जात असल्याचे सांगत भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आणि पक्षाच्या निर्णयांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. येणाऱ्या काळात पक्ष अधिक मजबूत होईल आणि जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करेल, असा विश्वास देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला.
