Gulabrao Patil : तालुक्यात निर्माण झालेली दुष्काळजन्य परिस्थिती आणि आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता प्रलंबित पाणीपुरवठा योजनांची कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या मुंबई येथील बैठकीत तालुक्यातील विविध गावांमधील पाणीपुरवठा योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रलंबित कामे नोव्हेंबर महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी ,गुंजाळवाडी, तळेगाव निमोण, सुकेवाडी, खांजापूर, चंदनापुरी, झोळे, हिवरगाव पावसा, वरवंडी, कासारा दुमाला, मांडवे तसेच तालुक्यातील इतर गावांमधील पाणीटंचाई आणि पाणीपुरवठा योजनांच्या अडचणी बाबत या बैठकी मध्ये चर्चा झाली.यावेळी आमदर खताळ यांनी तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेतील प्रलंबित कामे, योजनांना लागणारा निधी, वीजबिलाची थकबाकी तसेच काही ठिकाणी झालेल्या अपूर्ण कामांबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले. केवळ कागदोपत्री कामे न करता प्रत्यक्षात नागरिकांना पाणी मिळणे महत्त्वाचे आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये, ही माझी स्पष्ट भूमिका आहे. दुष्काळजन्य परिस्थितीत पाणी पुरवठा योजना फक्त कागदावर न राहता प्रत्यक्षात कार्यान्वित झाल्या पाहिजेत. प्रलंबित कामे कोणत्याही परिस्थितीत लांबवली जाऊ नयेत. जनतेच्या मूलभूत गरजांशी संबंधित कामात हलगर्जीपणा किंवा विलंब सहन केला जाणार नाही,” असे आमदार अमोल खताळ यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काही ठिकाणी विशिष्ट ठेकेदारांना फायदा होईल अशा पद्धतीने अधिकारी काम करत असल्याच्या तक्रारींबाबतही आमदार खताळ यांनी बैठकीत कठोर भूमिका मांडली. “शासकीय यंत्रणेने कोणत्याही ठेकेदाराच्या हितापेक्षा जनतेच्या हिताला प्राधान्य दिले पाहिजे. जर एखादा अधिकारी ठेकेदारांच्या फायद्यासाठी काम करत असेल, तर त्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली. आमदार खताळ यांच्या मागणीची दखल घेत मंत्री गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता थिटे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश प्रधान सचिवांना दिले. तसेच तालुक्यातील काही पाणीपुरवठा योजनांमध्ये झालेल्या अपूर्ण कामांबरोबरच अतिरिक्त निधीच्या अंदाजपत्रकासंदर्भातील बाबींचे राज्यस्तरीय यंत्रणेमार्फत त्रयस्थ लेखापरीक्षण (Third Party Audit) करण्याचा निर्णय घेण्यात आला. तपासात दोषी आढळणाऱ्या ठेकेदारांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
तालुक्यातील अनेक पाणीपुरवठा योजनांची वीजबिले थकीत असल्याने योजना बंद पडण्याची शक्यता निर्माण होऊ नये, यासाठीही आमदार खताळ यांनी शासनाचे लक्ष वेधले. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी थकीत वीजबिलांमुळे राज्यातील पाणीपुरवठा योजना बंद ठेवू नयेत, यासाठी आगामी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. याशिवाय राजापूर भागातील पाणीपुरवठा योजनेतून नागरिकांना स्वच्छ व नियमित पाणी मिळावे, तसेच जल जीवन मिशनच्या ज्या योजनांमध्ये वाड्या-वस्त्यांचा समावेश झालेला नाही, त्या सर्व वाड्या-वस्त्यांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी आमदार खताळ यांनी केली. यानुसार संबंधित सर्व योजनांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगून
ठेकेदारांच्या हितासाठी काम करणाऱ्या उपअभियंता थिटे सक्तीच्या रजेवर
“तालुक्यातील प्रत्येक गाव, वाडी-वस्तीपर्यंत पाणी पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे. पाणी हा नागरिकांचा मूलभूत प्रश्न असून, या प्रश्नावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. शासनस्तरावर आवश्यक ते सर्व निर्णय घेऊन संगमनेर तालुक्यातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी माझा पाठपुरावा यापुढेही सुरूच राहील,” असे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप जाहीर; भाजप 7 जागांवर लढणार-
या बैठकीसाठी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आमदार अमोल खताळ, विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, मुख्य अभियंता प्रशांत भामरे, मुख्य कार्यकारी अधिकारी देशपांडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
