Download App

Letsupp Special : आमदार-मंत्र्यांचे PA ते राज्याचे नेते; पडद्यामागून येत Politics गाजवणारे चेहरे

प्रफुल साळुंखे : 

सुमित वानखेडे. राज्याच्या राजकारणातील चाणाक्य, राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा प्रमुख चेहरा असलेले देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू खासगी सचिव. मागील काही दिवसांपासून सुमित वानखेडे यांच्या नावाची भावी आमदार म्हणून चर्चा सुरु आहे. यापूर्वी फडणवीस यांचे एक खासगी सचिव अभिमन्यू पवार मराठवाड्यातून आमदार झाले आहेत. अशात आता सुमित वानखेडे यांच्याही नावाची भावी आमदार म्हणून चर्चा सुरु झाली आहे. याच कारण म्हणजे त्यांचे मागील काही दिवसांपासून वाढलेले वर्धा आणि आर्वीचे दौरे.

वास्तविक सुमित वानखेडे मूळचे आर्वीकर तर त्यांची सासुरवाडी वर्धेची. पण जनतेच्या समस्या ऐकण्यात त्यांचा सर्वाधिक वेळ जातो. फडणवीस मुख्यमंत्री असताना तर वानखेडेंनी कोट्यवधी रुपयांच्या विकासयोजना आर्वी मतदारसंघात खेचून आणल्या होत्या. कारंजा नगरपालिकेत भाजप सत्तेत नाही, मात्र तरीही भाजपच्या नगरसेवकांना मोठा निधी मिळतो. याचेही उत्तर वानखेडे यांच्याच जवळ येऊन थांबते. त्यामुळे त्यांच्या नावाची भावी आमदार म्हणून चर्चा सुरु होते. पण सगळ्या चर्चांवर ते म्हणतात, की मी या भागात आलो की लोकं भेटायला येतात. मी कार्यक्रमास आलो पाहिजे असे त्यांना वाटतं.

मात्र आर्वी मतदारसंघातून वानखेडे यांच्या भावी आमदारांच्या चर्चांमुळे तेथील भाजप आमदार  दादाराव केचे नाराज झाले आहेत. त्यांनी ही नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. पण आता राजकीय बॉसला खुश करुन वानखेडे आर्वीतून तिकीट मिळविण्यात यशस्वी होणार का? असा सवाल विचारला जात आहे. याच पार्श्वभूमीवर कोणते पीए, खाजगी सचिव आपल्या पॉलिटिकल बॉसला खुश करून राजकारणात उतरले त्याचा हा आढावा.

आमदार-खासदार, मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम चेहरे कोण होते?

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी स्वीय सहाय्यक असतानाच राजकारणाचे धडे गिरवले. त्यांनी राजकारणात येण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले आहे.

 

माजी मंत्री जळगाव जिल्ह्यातील भुसावळ विधानसभेचे भाजप आमदार संजय सावकारे हे तत्कालीन आमदार अनिल चौधरी यांचे स्वीय सहाय्यक होते. पुढे भुसावळचा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर सावकारे आमदार झाले. चौधरी हे एकदा आमदार होते, पण सावकारे हे ३ वेळा आमदार झाले आणि एकदा राज्यमंत्रीही झाले.

 

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरचे आमदार संजय रायमूलकर हे खासदार प्रताप जाधव यांचे काम पहायचे. मेहकरचा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर ते आमदार झाले. रायमूलकर तिसऱ्यांदा निवडून आले आहेत.

 

आधी मनसे ते भाजप असा प्रवास केलेले राम कदम तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. पण त्यांची देखील सुरुवात स्वीय सहाय्यक म्हणून झाली आहे. कदम एकेकाळी भाजपचे नेते प्रमोद महाजन यांचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांच्या कार्यालयात काम करत होते.

 

शिवसेना (UBT) चे आमदार सुनील प्रभू हे शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांचे स्वीय सहाय्यक होते. तिथून ते नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर म्हणून निवडून आले होते. मग ते पुढे आमदारही झाले. आज सुनील प्रभू हे मातोश्रीचे निकटवर्तीय नेते समजले जातात.

 

राजकारणात येण्यापूर्वी हरिभाऊ राठोड हे मंत्रालयात लेखाधिकारी होते. युतीच्या पहिल्या सरकारमध्ये गोपीनाथ मुंडे यांचे खासगी सचिव म्हणून त्यांनी काम सुरु केले. पुढे त्यांना गोपिनाथ मुंडे यांनी आमदारकीचे तिकीट दिले ते निवडून आले. त्यानंतर ते दोनवेळा खासदार देखील झाले. त्यानंतर ते काँग्रेस, शिवसेना, आप असा प्रवास करत ते आता भारत राष्ट्र समितीमध्ये दाखल झाले आहेत.

 

माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे माजी खासदार सुबोध मोहिते हे माजी मंत्री महादेवराव शिवणकर यांचे ओएसडी होते. पुढे त्यांना शिवसेनेने रामटेक लोकसभेसाठी तिकीट दिले. त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते मुकुल वासनिक यांचा पराभव केला अन् खासदार झाले. त्याच टर्ममध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना केंद्रात मंत्रीपदाचीही संधी दिली.

 

अमित साटम हे राजकारणात येण्यापूर्वी एका आंतरराष्ट्रीय कंपनीत कामाला होते. पण राजकारणाची आवड असल्याने अंधेरीमध्ये भाजपचे काम सुरु केले आणि विभाग (वॉर्ड) सरचिटणीस झाले. त्यानंतर नोकरीचा राजीनामा देऊन ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे सचिव म्हणून दोन वर्षे काम केले. त्यानंतर नगरसेवक, आमदार असा त्यांचा प्रवास झाला.

 

दिवंगत बाळा सावंत हे शिवसेनेचे वांद्रे पूर्वचे आमदार होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेव ठाकरे यांचे ते अत्यंत विश्वासू आणि जवळचे सहकारी मानले जायचे. बाळासाहेबांची व्यक्तिगत काळजी घेण्याची सर्व जबाबदारी ही बाळा सावंत यांच्याकडे होती. पुढे ते नगरसेवक, आमदार झाले. पण ३ वर्षांतच त्यांचे निधान झाले. पुढे त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत पोटनिवडणुकीतून आमदार झाल्या.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे माजी आमदार रमेश कदम हे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांचे खाजगी सचिव म्हणून काम करायचे. पुढे ढोबळे यांनी त्यांना अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्षपद दिले. पुढे रमेश कदम यांनी लक्ष्मण ढोबळे यांच्याचविरोधात निवडणूक लढवली आणि निवडूनही आले. कदम आमदार असताना ढोबळे यांनी अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळा समोर आणला आणि कदम यांना तुरुंगात पाठवले.

 

पवार हे २०१४ च्या निवडणुकीत भाजप प्रभारी असलेल्या ओपी माथुर यांचे स्वीय सहाय्यक होते. पुढे सरकार आल्यानंतर माथुर यांनी अभिमन्यू पवार यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिफारस केली. पाच वर्ष काम करत असताना अभिमन्यू पवार यांनी मतदारसंघ बांधला आणि ते आमदार म्हणून निवडून आले.

पडद्यामागून येत राजकारण गाजवलेली नेत्यांची ही आम्हाला सुचलेली नावे होते. तुम्हाला वाचताना आणखी काही नवीन नाव सुचल्यास किंवा माहित असल्यास आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.

Tags

follow us