Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आज प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. राजकीय वर्तुळात सुरु असणाऱ्या चर्चांनुसार आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) किंवा आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद जाण्याची शक्यता आहे. तर जयंत पाटील भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. मात्र जयंत पाटील घाबरणारे नाही ते साहेबांसोबत राहणार असल्याची प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, शरद पवार साहेबांची जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्यासोबत बैठक झाली आहे. त्याबैठकीत ठरलेल्याप्रमाणे सर्वकाही होत आहे. जयंत पाटील यांनी राजीनामा दिला म्हणून ते भाजपमध्ये जाणार असं काही नाही. जयंत पाटील देखील घाबरणारे नाही. आतापर्यंत साहेबांसबोत राहिले आहे आणि पुढे देखील राहणार. सत्तेसाठी ते विचार सोडून जाणार नाही. असं रोहित पवार म्हणाले. तसेच मला प्रदेशाध्यक्ष व्हायचंय असं मी म्हणालो नाही. मला प्रदेशाध्यक्षपद नकोय. असं देखील माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले. नवीन प्रदेशाध्यक्ष कोण होणार याबाबत माहिती नाही. याची घोषणा 15 जुलैला होणार असल्याची माहिती देखील आमदार रोहित पवार यांनी दिली.
मला प्रदेशाध्यक्षपद नको : रोहित पवार
माध्यमांशी पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, मला प्रदेशाध्यक्षपद नको. पक्षात मला छोटं पद मिळालं तरी देखील त्या पदाला मी न्याय देणार असं देखील आमदार रोहित पवार म्हणाले. जर मी हेच पद हवं ते नको असं म्हणालो तर पक्षात लोकशाही नसेल. पक्षात लोकशाही मार्गाने चर्चा होणार असेही यावेळी रोहित पवार म्हणाले.
तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात ईडीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यासह काही जणांविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे रोहित पवार यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मात्र ईडीने राजकीय हेतूने कारवाई केली असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे.