Raj Thackeray : प्रवाशांच्या खासगी, तीन चाकी आणि चार चाकी वाहनांना राज्यात टोल नाही. फक्त व्यावसायिक वाहनांकडून टोल घेतला जात आहे, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज चांगलाच समाचार घेतला. तसेच राज्य सरकारला रोखठोक इशाराही देऊन टाकला. राज ठाकरे यांनी आज आपल्या घरी पत्रकार परिषद घेत टोलसंदर्भात भूमिका स्पष्ट केली. टोलवसुली हा राज्यातील मोठा घोटाळा आहे, असा दावाच त्यांनी केला.
फडणवीस यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे म्हणाले, फडणवीस तसे म्हणत असतील आम्ही टोलनाक्यांवर आमची माणसं उभी करू व प्रवाशांच्या वाहनांना टोल आकारू देणार नाही. मात्र, आम्हाला जर कुणी विरोध केला, कुणी अडवलं तर तो टोलनाकाच जाळून टाकू, पुढं सरकारला काय करायचं आहे ते करा, असा खणखणीत इशाराच राज ठाकरे यांनी दिला.
‘टोल’ राज्यातील मोठा घोटाळा, शहानिशा करा!’; व्हिडिओ दाखवत राज ठाकरेंनी केली पोलखोल
पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असणाऱ्या पत्रकारांना उद्देशून राज ठाकरे म्हणाले, तुम्ही तुमच्या वाहनांनी येथे आला आहात. तुम्ही टोल दिला की नाही ? राज्यात चारचाकी वाहनांवर सर्रास टोल वसूल केला जातो की नाही ? त्यावर पत्रकारांनी हो असे उत्तर दिले. म्हणजेच, याचा अर्थ काल फडणवीस जे बोलले ते धादांत खोटे होते. ते इतके थापा मारता हे माझ्यासाठी अनाकलनीय आहे. मला तर लोकांचा प्रश्न पडला आहे ते एवढे खोटे ऐकून कसे घेतात. म्हणून मी म्हणतो टोल हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा आहे आणि या घोटाळ्याची शहानिशा झाली पाहिजे, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.
आपलं टोलचं आंदोलन 2009-10 च्या सुमारास सुरू झालं. हा सगळा टोलचा कॅशमधला पैसा जातो कुठे?, याच होतं काय? आणि त्याच त्याच कंपन्यांना हे टोल मिळतात कसे? असे सवाल राज ठाकरे यांनी केले. यानंतरही जर शहरातील रस्त्यांवर खड्डे पडणार असतील तर हे पैसे जातात कुठे, असा प्रश्न पडतो असे राज ठाकरे म्हणाले. यानंतर त्यांनी राज्यातील नेत्यांच्या वक्तव्यांचे व्हिडिओ दाखवले. यानंतर ठाकरे म्हणाले, ही माणसं प्रत्येकवेळी टोल मुक्तीची घोषणा करतात. या सगळ्याच नेत्यांची राज्यात सरकारं होती तरी देखील टोलमुक्ती झाली नाही. राजकारणातील अनेक लोकांच्या उदरनिर्वाहाचं हे साधन आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
राष्ट्रवादीच्या 9 आमदारांना मंत्रिपद मिळाल्यानं अन्याय झाला का? भरत गोगावले म्हणाले…