Video : राज ठाकरे यांचा रायगड दौरा! मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरून सरकारवर निशाणा

राज्यातील विकासकामांकडे जनहिताच्या दृष्टीने न पाहता त्यातून किती टक्के मिळतील आणि जमिनी कशा विकल्या जातील, याचाच विचार सुरू असतो नेहमी.

Raj Thackeary On Raigad

राज ठाकरे यांचा रायगड दौरा! मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरून सरकारवर निशाणा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या रायगड (Raigad) दौऱ्यावर असून त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी सुरू केली आहे. पाहणीपूर्वी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी महामार्गाच्या रखडलेल्या कामासह कोकणातील विविध विकास प्रकल्पांवरून सरकारवर जोरदार टीका केली. कोकणात मोठमोठे प्रकल्प येत असले तरी त्याचा स्थानिकांना नेमका काय फायदा झाला, तसेच कोकणातील किती मुला-मुलींना रोजगार मिळाला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महामार्गाचा विकास जनतेच्या सोयीसाठी नव्हे, तर टक्केवारीसाठी केला जात असल्याची टीकाही त्यांनी केली.

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबाबत आपण यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. त्यावेळी कंत्राटदार काम सोडून गेल्याचे गडकरी यांनी सांगितले होते, असे राज ठाकरे यांनी नमूद केले. मात्र, कंत्राटदार कोणामुळे आणि कशामुळे कंटाळून गेले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. रस्त्याचे काम देण्यापूर्वी आवश्यक भूसंपादनाची जबाबदारी सरकारची असते. मात्र, येथे भूसंपादन पूर्ण न करताच कंत्राटदाराला काम देण्यात आले आणि सरकार मोकळे झाले, असा आरोप त्यांनी केला. कंत्राटाची रक्कम दिली जाते, त्यातून टक्केवारी जाते आणि प्रत्यक्षात रस्ता मात्र रखडलेलाच राहतो. राज्यातील विकासकामांकडे जनहिताच्या दृष्टीने न पाहता त्यातून किती टक्के मिळतील आणि जमिनी कशा विकल्या जातील, याचाच विचार सुरू असल्याची टीका त्यांनी केली.

‘तिसरी मुंबई’च्या माध्यमातून एज्युकेशनल सिटी, मेडिकल सिटी, स्पोर्ट्स सिटी, डेटा सेंटर, संशोधन संस्था, व्यावसायिक केंद्र, आंतरराष्ट्रीय विद्यापीठ तसेच जागतिक तंत्रज्ञान कंपन्या आणि सेवा उद्योग आणण्याचे नियोजन असल्याचा उल्लेख करत राज ठाकरे यांनी स्थानिकांच्या भवितव्याबाबत प्रश्न उपस्थित केले. पेण, पनवेल आणि रायगडमधील तरुण-तरुणींना या नव्या संधींसाठी आवश्यक कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे का, असा सवाल त्यांनी केला. स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्यानंतर त्यांच्या मुला-मुलींना रोजगार आणि संधी मिळणार नसतील, तर या विकासाचा फायदा कोणाला होणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कोकणातील जमिनी विकणे हाच विकासाचा एकमेव मार्ग बनला असून, येथील परिस्थिती पाहता आता ‘विकास नको’ असे म्हणण्याची वेळ आली आहे, अशी परखड भूमिका त्यांनी मांडली.

स्थानिकांच्या जमिनी, पाणी आणि वीज वापरून उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पांचा लाभ मात्र बाहेरच्या लोकांना होणार असेल, तर स्थानिकांचा विकास कसा होणार, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. प्रकल्पांसाठी जमीन देणाऱ्या कुटुंबांचे आणि त्यांच्या पुढील पिढ्यांचे भवितव्य काय, याचा विचार झाला पाहिजे, असे ते म्हणाले. स्थानिक मुला-मुलींची प्रगती होणार नसेल तर या विकासाचा उपयोग काय, असा सवाल करत त्यांनी आमदारांकडून जमिनी घेणे आणि त्यांचे तुकडे पाडण्याच्या व्यवहारांवरही टीका केली. स्थानिकांनी या विषयाचे गांभीर्य समजून घेऊन विरोध करण्याची गरज असल्याचे सांगत, निवडणुकीच्या वेळी पैसे घेऊन मतदान केल्यास भविष्यात आपल्या पायाखालची जमीनच निघून जाईल आणि महाराष्ट्र विकला जाईल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच, ‘हे काय पालकमंत्र्यांचे काम आहे का?’ असा सवाल करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवरही निशाणा साधला.

Exit mobile version