‘दोन टर्मच्या आमदाराला सरोगसीचा अर्थ माहिती आहे का?’ अनिकेत तटकरेंनी महेंद्र दळवींना डिवचलं
दळवी यांनी आपला उल्लेख ‘सरोगसी बाळ’ असा केल्यानंतर अनिकेत तटकरे यांनी त्याच शब्दावरून दळवींना खोचक आव्हान दिले आहे.
Aniket Tatkare took a dig at Mahendra Dalvi : रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष संपल्याचे चित्र निर्माण झाले असतानाच आता अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी आणि तटकरे कुटुंबातील राजकीय वितुष्ट पुन्हा वाढताना दिसत आहे. महेंद्र दळवी सातत्याने तटकरे कुटुंबावर टीका करत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विधानपरिषदेचे आमदार अनिकेत तटकरे यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. दळवी यांनी आपला उल्लेख ‘सरोगसी बाळ’ असा केल्यानंतर अनिकेत तटकरे यांनी त्याच शब्दावरून दळवींना खोचक आव्हान दिले आहे.
महेंद्र दळवी यांना ‘सरोगसी’ हा शब्द मराठी किंवा इंग्रजीमध्ये लिहिता येत असेल, तर त्यांनी तो लिहून दाखवावा. दोन टर्म आमदार असलेल्या व्यक्तीला सरोगसी या शब्दाचा अर्थ माहीत आहे का, हे तरी आम्हाला कळेल, अशा शब्दांत अनिकेत तटकरे यांनी महेंद्र दळवी यांना प्रत्युत्तर दिले. त्यामुळे रायगडमधील महायुतीच्या दोन घटक पक्षांतील नेत्यांमध्ये पुन्हा एकदा शाब्दिक चकमक सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.
या वादाची सुरुवात महेंद्र दळवी यांनी अनिकेत तटकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर झाली. दळवी यांनी अनिकेत तटकरे यांचा उल्लेख ‘सरोगसी बाळ’ असा करत त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर निशाणा साधला होता. आम्ही विधानपरिषदेला फॉर्म काढला नसता तर लढाई झाली असती आणि आम्ही जिंकलो असतो. त्यामुळे अनिकेत तटकरे यांचा राजकीय जन्मच झाला नसता, अशा शब्दांत महेंद्र दळवी यांनी तटकरे यांच्यावर प्रहार केला होता. त्यानंतर अनिकेत तटकरे यांनीही दळवींच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देत त्यांना ‘सरोगसी’ शब्दाचा अर्थ माहीत आहे का, असा खोचक सवाल केला आहे.
‘आमचे मंत्री आताही जरांगे पाटलांशी चर्चा करत आहेत’; एकनाथ शिंदेंनी परभणीत स्पष्ट केली सरकारची भूमिका
गेल्या काही दिवसांपासून महेंद्र दळवी आणि तटकरे कुटुंबातील राजकीय संघर्ष सातत्याने समोर येत आहे. कर्जतमध्ये अनिकेत तटकरे यांनी महेंद्र दळवी यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर दळवी यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. आता ‘सरोगसी’च्या उल्लेखावरून दोन्ही नेते पुन्हा आमनेसामने आल्याने रायगडमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.
दरम्यान, महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावरही नाव न घेता निशाणा साधला होता. महायुती राज्यात भक्कम असल्याचे वरिष्ठ नेत्यांकडून वारंवार सांगितले जात असले तरी रायगडमध्ये मात्र दोन्ही पक्षांतील नेत्यांचा संघर्ष वारंवार चव्हाट्यावर येत आहे. भरत गोगावले यांनी मला शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. अन्यथा मी गिअर बदलून होतो, असे महेंद्र दळवी म्हणाले.
अहिल्यानगर-बीड रेल्वे प्रवास आता अधिक वेगवान होणार; दीड तास वेळ वाचणार
याचवेळी दळवी यांनी तटकरे यांना अप्रत्यक्षपणे सबुरीचा सल्लाही दिला. मला त्यांना सबुरीचा सल्ला द्यायला आवडेल. कारण आता आमचे दिवस आहेत, मागे तुमचे दिवस होते. येणारा काळही आता आमच्यासाठी आहे. शिवसेनेचे बळ आता वाढलेले आहे, असे म्हणत दळवी यांनी सुनील तटकरे यांचे नाव न घेता इशारा दिला.
एकीकडे राज्याच्या पातळीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत एकत्र असताना रायगडमध्ये मात्र दोन्ही पक्षांतील स्थानिक नेत्यांमधील राजकीय संघर्ष कायम असल्याचे दिसत आहे. महेंद्र दळवी आणि तटकरे कुटुंबातील आरोप-प्रत्यारोप आता वैयक्तिक टीकेपर्यंत पोहोचले आहेत. ‘सरोगसी बाळ’ या वक्तव्यावरून अनिकेत तटकरे यांनी केलेल्या पलटवारामुळे हा वाद आणखी तीव्र झाला असून रायगडमधील महायुतीच्या अंतर्गत राजकारणाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.