अहिल्यानगर-बीड रेल्वे प्रवास आता अधिक वेगवान होणार; दीड तास वेळ वाचणार
Beed Ahilyanagar Railway: बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी ही जिल्हावासियांना गोड बातमी पत्रकाद्वारे दिली आहे. डेमू ट्रेनच्या वेगात लक्षणीय वाढ करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
अहिल्यानगर – बीड – परळी लोहमार्गाची 45 वर्षांची मागणी. अनेक आंदोलने, विविध नेत्यांचा पाठपुरावा यानंतर मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कशीबशी अहिल्यानगर ते बीड (Beed Ahilyanagar Railway) या लोहमार्गावर डेमू रेल्वे धावली. पण कनेक्टीव्हीटी नाही अन॒ विद्युतीकरण अपुरे असल्याने वेगही मंद असा मागच्या वर्षभरापासून या रेल्वेचा संथ प्रवास सुरु आहे. मात्र, मंगळवार ( एक सप्टेंबर) पासून ही रेल्वे अधिक वेगाने धावणार आहे.
बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी ही जिल्हावासियांना गोड बातमी पत्रकाद्वारे दिली आहे. डेमू ट्रेनच्या वेगात लक्षणीय वाढ करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. गाड्यांचे सुधारित वेळापत्रकही अधिकृतपणे अधिसूचित करण्यात आले आहे. या नव्या निर्णयामुळे बीड ते अहिल्यानगर या दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ तब्बल 1 तास 35 मिनिटांनी कमी होणार आहे. आता हा प्रवास चार तासांत होणार आहे.
परभणीत संजय जाधवांच्या मेळाव्यात राडा; जरांगेंच्या इशाऱ्यानंतर जोरदार घोषणाबाजी, पोलिसांचा हस्तक्षेप
अहिल्यानगर-बीड -परळी लोहमार्गाची सुरुवातीचा खर्च दोनशे कोटींच्या घरात होता. मात्र, पुढे काम रखडले आणि हा खर्च तब्बल चार हजार कोटी रुपयांच्या घरात गेला. दरम्यान, मागच्या काही वर्षांत लोहमार्ग बांधणी वेगाने झाली. 240 किलोमीटर अंतरापैकी अहिल्यानगर ते बीड हे 135 किलोमीटरच्या अंतराचे काम मागच्या वर्षी पूर्ण झाल्यानंतर तत्कालिन दिवंगत उपमुख्यमंत्री व बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालून उर्वरित तांत्रिक व प्रशासकीय बाबी पूर्णत्वास नेत मागच्या वर्षी 17 सप्टेंबरला अहिल्यानगर ते बीड डेमू रेल्वे सुरु केली. मात्र, विद्युतीकरण अपूर्ण असल्याने सध्या ही रेल्वे अगदी संथगतीने धावत आहे. दरम्यान, अहिल्यानगर आणि बीड या दोन शहरांदरम्यान प्रवाशांची सोय वाढवणे, तसेच अधिक जलद आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्याच्या दृष्टीने या डेमू रेल्वेचा वेग वाढवण्यात आला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार गाडी क्रमांक 71441 अहिल्यानगर– बीड डेमू सेवा 1 सप्टेंबरपासून अहिल्यानगर स्थानकावरून सकाळी 6:55 ऐवजी 50 मिनिटे उशिरा, म्हणजेच सकाळी 7.45 वाजता सुटेल. मात्र, वेगात वाढ केल्यामुळे ही गाडी बीड येथे पूर्वीच्या दुपारी 12:30 ऐवजी खूप आधी, म्हणजेच सकाळी 11:45 वाजताच पोहोचेल. परतीच्या प्रवासात, गाडी क्रमांक 71442 बीड – अहिल्यानगर डेमू सेवा बीडस्थानकावरून दुपारी एक वाजता ऐवजी एक तास आधी, म्हणजेच दुपारी 12.00 वाजता प्रस्थान करेल. ही गाडी अहिल्यानगर येथे जुन्या वेळेनुसार सायंकाळी 6:30 ऐवजी तब्बल अडीच तास आधी, म्हणजेच दुपारी चार वाजता वाजता पोहोचेल.
सुभाष चंद्रा यांच्या कर्जसेटलमेंटला LIC, यूनियन बँकेचा थेट विरोध; NCLATमध्ये अपील करणार
असे आहेत रेल्वेथांबा
या दोन्ही गाड्यांच्या प्रवासादरम्यान अहिल्यानगर, नारायणदोहो, न्यू लोणी, सोलापूरवाडी, न्यू धानोरा, कडा, न्यू आष्टी, वेताळवाडी, हाटोला, अमळनेर भांड्याचे, जटनानदूर, विघनवाडी, रायमोहा, राजुरी आणि बीड या सर्व प्रमुखस्थानकांवर नेहमीप्रमाणे थांबे कायम राहणार आहेत. दरम्यान बीड ते वडवणीपर्यंतच्या लोहमार्गाची चाचणी घेण्यात आली आहे. ही रेल्वेही लवकर सुरु होण्यासाठी पाठपुरावा सुरु असल्याची माहिती खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली. बीड ते अहिल्यानगर रस्त्यावरील विद्युतीकरणाची कामेही वेगात सुरु असल्याचे बजरंग सोनवणे म्हणाले.