परभणीत संजय जाधवांच्या मेळाव्यात राडा; जरांगेंच्या इशाऱ्यानंतर जोरदार घोषणाबाजी, पोलिसांचा हस्तक्षेप

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम रद्द करावा, अशी विनंती जरांगे यांनी केली होती.

Banduuu

परभणीत खासदार संजय जाधव यांनी (Jarange) आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याला गालबोट लागलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी हा मेळावा रद्द करण्याची विनंती जाधव यांच्याकडे केली होती. मेळावा रद्द केला नाही तर आपण स्वतः तिथे येऊ, असा इशाराही जरांगे यांनी दिला होता. मात्र जाधव यांनी कार्यक्रम रद्द न करण्याची भूमिका घेतल्याने अखेर मेळाव्याच्या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला आणि काही जणांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला विरोध नोंदवला.

परभणी आणि आसपासच्या भागातून मोठ्या संख्येने शेतकरी या मेळाव्यासाठी दाखल झाले होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही उपस्थिती होती. मेळावा सुरू असतानाच खासदार संजय जाधव भाषण करत होते. याचवेळी कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या काही लोकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे सभास्थळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं.

घोषणाबाजी वाढल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केला. पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांना सभास्थळाच्या बाहेर काढलं. त्यामुळे पुढचा मोठा वाद टळला. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर मेळाव्याचं वातावरण पुन्हा नियंत्रणात आलं असून सध्या कार्यक्रमस्थळी परिस्थिती सामान्य असल्याची माहिती आहे.

बंडू जाधवनं लय मोठी चूक केली, आता; जरांगे भडकले!

दरम्यान, या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील आणि संजय जाधव यांच्यात फोनवरून चर्चा झाली होती. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम रद्द करावा, अशी विनंती जरांगे यांनी केली होती. मेळावा रद्द न केल्यास आपण तिथे येणार असल्याचंही त्यांनी जाधव यांना सांगितलं होतं. त्यामुळे आजच्या मेळाव्याकडे आधीपासूनच सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.

मात्र एवढ्या उशिरा कार्यक्रम रद्द करणं शक्य नसल्याचं संजय जाधव यांनी स्पष्ट केलं होतं. जवळपास 15 दिवसांपासून मेळाव्याची तयारी सुरू होती आणि सकाळी 11 वाजता कार्यक्रम रद्द करण्याची विनंती करण्यात आली. रात्रीच सांगितलं असतं तर कार्यक्रम रद्द केला असता, मात्र शेतकरी आणि इतर लोक कार्यक्रमस्थळी आल्यानंतर अचानक कार्यक्रम रद्द करणं योग्य वाटत नसल्याचं जाधव यांनी सांगितलं. जरांगे पाटील यांना आपल्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार असून त्यांच्या भावनांचा आपण आदर करतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

आता या पार्श्वभूमीवर परभणीतील शेतकरी मेळाव्यात झालेल्या घोषणाबाजीमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. एका बाजूला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू असताना दुसरीकडे त्यांच्या विनंतीनंतरही आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यातच घोषणाबाजी झाल्याने या घटनेची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर मेळावा सुरळीत सुरू राहिला.

follow us