नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र आणि मनसे (MNS) नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांची गाडी अडविल्यामुळे संतप्त झालेल्या मनसैनिकांनी टोल नाकाच फोडला आहे. रात्री सुमारे अडीच वाजता समृद्धी महामर्गावरील सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा टोल नाक्यावर मनसैनिकांचे खळ्ळखट्याक पाहायला मिळाले. या तोडफोडीत टोल नाक्याचे मोठे नुकसान झाले आहे. (MNS Leader Amit Thackeray told about MNS workers broke Tola Naka on Samruddhi Highway)
दरम्यान, या खळ्ळखट्याकवर अमित ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, समृद्धीवरुन सिन्नरला जो नाशिकसाठी फाटा आहे, तिथे टोल नाक्याला गाडी थांबवली. गाडीला फास्टटॅग होता, तरी तो रॉड खाली आला. त्यांची काही तरी तांत्रिक अडचण होती. माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं की फास्टटॅग आहे, तुम्ही सोडत का नाही? त्यावर ते म्हणाले आमची काही तरी तांत्रिक अडचण आहे. ते जरा बोलताना उद्धट उत्तर देत होते. सहकाऱ्यांनी गाडी कोणाची आहे, काय सांगितलं. त्यानंतरही त्यांने त्यांच्या मॅनेजरला फोन लावला, तो पण उद्धटपणे बोलू लागला.
अमित ठाकरेंची गाडी अडवली म्हणून मनसैनिकांनी टोलनाकाच फोडला.
–@mnsadhikrut #AmitThackeray #MNS #tollbooth #LetsUppMarathi pic.twitter.com/zb6pL9Z1N6— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) July 23, 2023
त्यानंतर त्यांनी 10-15 मिनिटे गाडी थांबवून ठेवली आणि सोडली. मला वाटत त्या टोल नाक्यावर कोणाला तरी कळलं असेल कोणाची गाडी आहे. त्यानंतर टोल नाका सोडून हॉटेलवर पोहचलो तेच कळलं की टोल नाका फुटला. साहेबांमुळे 65 टोल नाके बंद झाले, माझ्यामुळे अजून एक बंद झाला, असं म्हणत अमित ठाकरे यांनी मध्यरात्री टोल नाका नेमका कसा फुटला याची हकीकतच सांगितली. दरम्यान, अद्याप या प्रकरणी पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती आहे.
मागील पाच दिवसांपासून अमित ठाकरे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर होते. धुळे, नंदुरबारचा दौरा संपवून शनिवारी ते अहमदनगरमध्ये होते. त्यानंतर ते शिर्डीहून नाशिकला गेले. दरम्यान, मध्यरात्री समृद्धी महामार्गावरील सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा या ठिकाणी असलेल्या टोल नाक्यावर अमित ठाकरे यांची गाडी अडवण्यात आली. सुमारे अर्धा तास त्यांचा ताफा टोल नाक्यावरच थांबला होता. यानंतर अमित ठाकरे यांना जबरदस्ती थांबवून ठेवले असल्याचा दावा करत नाशिक शहर अध्यक्ष दिलीप दातीर यांच्यासह समर्थकांनी टोल नाक्याची तोडफोड केली.
या तोडफोडी दरम्यानचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतं आहे. यात 10 ते 12 कार्यकर्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, अशा घोषणा देत हातात हॉकी स्टिक आणि लाठी घेत टोल नाक्याची तोड-फोड करत असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, या तोडफोडीत टोल नाक्याचं मोठं नुकसान झालं आहे. ऑटोमॅटिक बुम बॅरिअर, टोल बुथच्या काचांची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. अमित ठाकरे यांना अडविल्याचा निषेध म्हणून हा टोल नाका फोडला असल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे. शिवाय पुन्हा असे झाल्यास पुन्हा तोडफोड करू असा इशाराही दिला आहे.