Mohan Bhagwat’s significant statement regarding the new generation : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज जेनजी अर्थात नव्या पिढीतील युवक-युवतींशी संवाद साधताना त्यांच्या विचारसरणी, अपेक्षा आणि आंदोलनांच्या भूमिकेबाबत सविस्तर मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी शिक्षण, लोकशाही, संवाद आणि सामाजिक सहभाग यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केले.
मोहन भागवत म्हणाले की, आजची जेनजी ही पूर्वीच्या पिढ्यांपेक्षा वेगळी आहे. आमच्या पिढीतील लोक मोठ्यांनी सांगितले ते ऐकत असत. आम्ही कधी मोठ्यांना उलट प्रश्न विचारला नाही. मात्र आजची पिढी प्रत्येक प्रश्नाचे तर्कसंगत उत्तर मागते. त्यांना केवळ आदेश नकोत, तर त्यामागील कारणे आणि विचार समजून घ्यायचे असतात. त्याचबरोबर त्यांना आपुलकी आणि प्रेमाचीही अपेक्षा असते.
शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्न आणि अपुऱ्या सुविधा यामुळे युवकांमध्ये अस्वस्थता निर्माण होत असल्याचे नमूद करत भागवत म्हणाले की, संवाद हा कोणत्याही समस्येच्या समाधानाचा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे. संवादातून प्रश्न सुटले नाहीत तर लोकशाहीत आंदोलनाचाही मार्ग स्वीकारला जाऊ शकतो. आंदोलन हे लोकशाही प्रक्रियेचा एक भाग असून ते संवादाचाच एक प्रकार आहे.
नियमभंगाचा कळस! कारणे दाखवा नोटीस आणि सुनावणीनंतरही खुलासा अपुरा; इंड्युकेअर फार्माचा परवाना रद्द
मात्र आंदोलन करताना संविधानाने घालून दिलेल्या मर्यादा आणि नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात आंदोलनाचा लोकशाही मार्ग सांगितला आहे. आंदोलन हे व्यवस्था सुधारण्यासाठी असावे, एखाद्या व्यक्ती किंवा समूहाच्या विरोधासाठी नव्हे. आंदोलनाचे उद्दिष्ट परिवर्तन आणि सुधारणा असले पाहिजे, असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी आंदोलनांना देशद्रोहाशी जोडण्याच्या प्रवृत्तीवरही भाष्य केले. आंदोलन म्हणजे देशद्रोह नव्हे. आंदोलन करणारेही आपल्या समाजाचाच भाग आहेत. त्यांना समजून घेणे आणि त्यांच्याशी संवाद साधणे आवश्यक आहे. नव्या पिढीतील युवक अधिक प्रामाणिक असून देशभक्तीसाठी हाच प्रामाणिकपणा महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जबाबत विचारण्यात आले असता, त्याविषयी आपल्याकडे संपूर्ण माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केवळ बातम्यांच्या आधारे निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. नेमकी चूक कुठे झाली, हे वस्तुस्थिती समोर आल्यानंतरच स्पष्ट होईल, असे त्यांनी म्हटले. मात्र जेनजीवर आपला विश्वास असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर भाष्य करताना भागवत यांनी देशातील अनेक शाळांमध्ये अद्याप मूलभूत सुविधांचा अभाव असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. लाखो विद्यार्थ्यांना स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधाही उपलब्ध नाहीत, ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
धनुष्यबाण कोणाचा? सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढील आठवड्यात; संघटनात्मक बहुमताचा ठाकरे गटाचा दावा
शिक्षण हा व्यवसाय नसून समाजनिर्मितीचा पाया असल्याचे सांगताना ते म्हणाले की, शिक्षण व्यवस्था सर्वांसाठी सुलभ आणि दर्जेदार असली पाहिजे. केवळ सरकारवर अवलंबून न राहता समाज, कार्यकर्ते, शिक्षक आणि पालक यांनीही शिक्षण क्षेत्राच्या उभारणीत सक्रिय सहभाग घ्यायला हवा. अनेक गावांमध्ये लोकसहभागातून चांगल्या शाळा उभ्या राहिल्याची उदाहरणेही त्यांनी दिली.
देशातील सुमारे दहा लाख शिक्षक पदे रिक्त असल्याच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी शिक्षण क्षेत्रासाठी सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहा टक्के निधीची मागणी योग्य असल्याचे म्हटले. मात्र केवळ निधी वाढवून प्रश्न सुटणार नाहीत. शिक्षण व्यवस्थेमध्ये सकारात्मक दृष्टीकोन, सामाजिक बांधिलकी आणि परिवर्तनाची भावना निर्माण करणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षण क्षेत्रातील सुधारणा आणि समाजपरिवर्तनासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, समाजोपयोगी प्रकल्प उभे करावेत आणि सकारात्मक बदलाचे वाहक बनावे, असे आवाहन करत त्यांनी आपले विचार मांडले. संवाद, सहभाग आणि लोकशाही मूल्यांच्या आधारेच देशातील प्रश्न सोडवले जाऊ शकतात, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
