केरळमध्ये उद्या मॉन्सून दाखल होण्याची शक्यता, राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी

हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या मॉन्सूनचे केरळमध्ये आगमन होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मॉन्सून हळूहळू पुढे सरकेल.

Untitled Design 25

Untitled Design 25

Monsoon likely to arrive in Kerala tomorrow : राज्यातील उष्णतेपासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या मॉन्सूनचे केरळमध्ये आगमन होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मॉन्सून हळूहळू पुढे सरकेल. दरम्यान, मराठवाडा आणि कोकणातील अनेक भागांमध्ये मॉन्सूनपूर्व पावसाची सुरुवात झाली आहे.

आज राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे, उष्णतेची तीव्रता अद्याप काही भागांमध्ये कायम असून ब्रह्मपुरी येथे राज्यातील सर्वाधिक 43.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच जळगाव, धुळे, परभणी, मालेगाव, गोंदिया आणि अमरावती येथे तापमान 41 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले.

मॉन्सून सध्या लक्षद्वीप परिसर, कोमोरिन क्षेत्र आणि अरबी समुद्रातून पुढे सरकत असून लवकरच महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतकरी वर्गही मॉन्सूनच्या पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. यंदा मॉन्सून वेळेवर राज्यात पोहोचेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, सध्या राज्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

आज शिवकुमार घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ, यतींद्र सिद्धरामय्या यांच्यासह अनेक दिग्गज मंत्रिपदाच्या शर्यतीत

पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात पूर्वमौसमी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. माळवाडी गावात दुर्दैवी घटना घडली असून पावसादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तसेच आणखी एक महिला किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. विशेषतः बेलगाव तऱ्हाळे, धामणगाव, टाकेद, खेड, धामणी, समनेरा, साकूर, भरवीर, पिंपळगाव डुकरा, आधारवड आणि वासळी परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची धावपळ उडाली.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत असून काही ठिकाणी गारपिटीचीही नोंद झाली आहे. दरम्यान, विदर्भासाठी चिंताजनक अंदाज समोर आला आहे. यंदा या विभागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून 92 ते 94 टक्क्यांपर्यंतच पर्जन्यमान राहू शकते. जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज आहे. तसेच विदर्भात मान्सून 10 ते 15 जूनदरम्यान दाखल होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version