बंगालच्या उपसागरातील अनुकूल परिस्थितीचा परिणाम, राज्यात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा अंदाज
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Forecast of heavy rain : गेल्या दीड महिन्यांपासून राज्यातील अनेक भागांत पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. खरीप हंगामाच्या मध्यावर देखील अपेक्षित पाऊस न झाल्याने पिके करपू लागली होती, तर अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट उभे राहिले होते. मात्र आता बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली अनुकूल हवामान प्रणाली आणि वाढलेली आर्दता यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाळा पोषक वातावरण तयार झाले असून, घाटमाथ्यासह मराठवाडा आणि विदर्भात देखील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय झाली आहे. त्याचबरोबर अरबी समुद्रातील वाऱ्यांचा वेग वाढल्याने राज्यभरातील पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेषतः घाटमाथा परिसरात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागांत पावसाने पुन्हा हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. रविवारी पुणे, अहिल्यानगर, बीड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच विदर्भातील वाशीम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांत देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 21 जुलै रोजी रायगड, पुणे आणि नाशिकच्या घाटमाथा भागात पावसाचा जोर वाढू शकतो. तर 22 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, पालघर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे कोकण आणि घाटमाथा भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिकमध्ये सराफाचा मोठा कारनामा; माजी महापौरांच्या कुटुंबाची 200 तोळे सोन्याची फसवणूक
यंदा जून महिन्यात पावसाचे आगमन उशिरा झाले. त्यानंतरही दीर्घकाळ पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी चिंतेत होते. धरणांतील पाणीसाठाही अपेक्षेपेक्षा कमी असल्याने अनेक भागांत पाणीटंचाईची भीती व्यक्त केली जात होती. मात्र आता पावसाची पुनरागमनाची चिन्हे दिसू लागल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, परभणी जिल्ह्यात तब्बल वीस दिवसांच्या विश्रांतीनंतर दमदार पावसाने हजेरी लावली आहे. परभणी शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांत झालेल्या समाधानकारक पावसामुळे सोयाबीन, कापूस आणि इतर खरीप पिकांना नवसंजीवनी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून पाण्याअभावी करपू लागलेली पिके आता सावरण्याची शक्यता असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा समाधान झळकू लागले आहे.
एकूणच, जवळपास तीन आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर राज्यात पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. आगामी काही दिवसांत पावसाची साथ कायम राहिल्यास खरीप हंगामाला मोठा आधार मिळणार असून, राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी ठरणार आहे.