नाशिकमध्ये सराफाचा मोठा कारनामा; माजी महापौरांच्या कुटुंबाची 200 तोळे सोन्याची फसवणूक

नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या कुटुंबाची तब्ब्ल 200 तोळे सोन्याची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

  • Written By: Published:
Untitled Design (53)

Fraud involving 200 tolas of gold : नाशिकच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडवणारे एक मोठे फसवणुकीचे प्रकरण समोर आले आहे. नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या कुटुंबाची तब्ब्ल 200 तोळे सोन्याची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दागिने दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत एका सराफ व्यावसायिकाने कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप करण्यात आला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, संशयित योगेश बाळकृष्ण दाभाडे हा सराफ व्यावसायिक गेल्या दोन वर्षांपासून मुर्तडक कुटुंबाच्या संपर्कात होता. या काळात त्याने कुटुंबातील सदस्यांशी विश्वासाचे संबंध निर्माण केले. विशेषतः घरातील महिलांचा विश्वास संपादन करून गुंतवणुकीच्या नावाखाली आणि सोने दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत त्यांना जाळ्यात ओढल्याचा आरोप आहे.

तक्रारीनुसार, अशोक मुर्तडक यांच्या पत्नींकडील 100 तोळे, मुलीकडील 50 तोळे आणि सुनेकडील 500 तोळे असे एकूण 200 तोळे सोन्याचे दागिने संशयिताने स्वतःच्या ताब्यात घेतले. हे दागिने दुप्पट करून परत देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, दागिने घेतल्यानंतर त्याने ना दुप्पट सोने दिले, ना मूळ दागिने परत केले.

डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणात उच्च न्यायालयाचा दणका; रमेश म्हात्रे यांचा जामीन स्थगित

सुरूवातीला संशयिताने विविध करणे देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. अनेक महिने उलटून देखील कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने कुटुंबियांना संशय येऊ लागला. अखेर घरातील महिलांनी हा संपूर्ण प्रकार अशोक मुर्तडक यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर त्यांनी संशयिताकडे वारंवार दागिने मागितले. मात्र, योगेश दाभाडे याने विविध कारणे सांगत तब्बल दीड वर्ष वेळकाढूपणा केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

अखेर आपली मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाल्याची खात्री पटल्याने अशोक मुर्तडक यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेत अधिकृत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. सुमारे 200 तोळे म्हणजेच जवळपास 2 किलो सोन्याचा हा व्यवहार असल्याने या फसवणुकीची रक्कम कोट्यवधी रुपयांमध्ये असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे हे प्रकरण नाशिकमधील अलीकडच्या काळातील सर्वात मोठ्या आर्थिक फसवणूक प्रकरणांपैकी एक मानले जात आहे.

दरम्यान, या हायप्रोफाईल प्रकरणामुळे नाशिकच्या राजकीय, सामाजिक आणि व्यापारी वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून संशयिताने आणखी कोणाची फसवणूक केली आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणातील पुढील तपास पंचवटी पोलीसांकडून सुरू असून लवकरच आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Tags

follow us