Mansoon Rain : मान्सून सक्रिय झाला असून आजच मान्सून केरळ राज्यात धडकण्याचा अंदाज आहे. अंदमानात मान्सून बराच काळ रेंगाळला होता आता मात्र त्याने वेग घेतला आहे. दरम्यान आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. नगर, नाशिक, पुण्यासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी गारांचा पाऊस झाला.
मान्सून नैऋत्येकडे वेगाने सरकत असल्याने आजच केरळच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. चार जूनला मान्सून येईल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला होता. त्यानुसार मान्सूनने आपल्या आगमनाचे संकेत दिले आहेत. खात्याचा अंदाज बरोबर ठरण्याची शक्यता आहे. मान्सून मालदीव समुद्रातून अरबी समुद्रात दाखल झाल्याचे सांगण्यात आले.
महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला त्यामुळे मान्सून राज्यात केव्हा येणार असा प्रश्न विचारण्यात येत आहे. याचे उत्तर हवामान खात्याने दिले आहे. महाराष्ट्रात साधारण 10 जून रोजी मान्सून दाखल होईल. यंदा राज्यात एकूण सरासरीच्या 95 टक्के पाऊस होईल. तसेच जून आणि जुलै या दोन महिन्यांत कमी पाऊस तर ऑगस्ट महिन्यात साधारण पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
पाऊस आला आणि बत्ती गुल
राज्यात आज अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. सकाळी उन पडले होते. दुपारी मात्र वातावरणात बदल झाला. जोरदार वारा सुरू झाला आणि काही वेळातच जोरदार पाऊस सुरू झाला. नगर शहरासह नेवासा आणि अन्य तालुक्यात पावसाने हजेरी लावली. या व्यतिरिक्त नाशिक, पुणे आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात गारांसह पाऊस झाला. या पावसाने अनेक ठिकाणी वीज पुरवठ्यावर परिणाम झाला. आज रविवार सुट्टीचा दिवस त्यात पाऊस सुरू झाला पण दुपारच्या वेळेस लाईट गेली. नगर शहरात सावेडी, निर्मल नगर, पाइपलाइन रोड, भिस्तबाग चौक या ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता.