महादेवराव महाडिक हा जिल्ह्याचा जादूगार असल्याने निकाल सांगण्याची गरज नाही, या शब्दांत खासदार धनंजय महाडिक यांनी छत्रपती साखर कारखान्याच्या निवडणुकीत सहकार पॅनलचाच विजय होणार असल्याचं निकाला आधीच जाहीर केलं आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या श्री छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या (Rajaram Sakhar Karkhana) निवडणुकीसाठी आज सकाळी आठ वाजल्यापासून मतदानास प्रारंभ झाला आहे.
सत्ताधारी महाडिक आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरातील सेंट झेवियर्स मतदान केंद्रामध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी महादेवराव महाडिक यांनी आमचा विजय निश्चित असल्याची ग्वाही दिली.
यावेळी बोलताना महादेवराव महाडिक म्हणाले की, “महाडिकांना निवडणूक नेहमीच सोपी असते. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. माझं कसं असतं धर की पकड आणि स्वारी घाल ते लगेच चिटपट कर. त्यामुळे माझ्यासाठी राजारामची लढाई छोटी आहे, आमचा विजय निश्चित आहे.
तसेच छत्रपती राजाराम कारखान्याच्या निवडणुकीतून संस्था गटातून माजी आमदार महादेवराव महाडिक रिंगणात आहेत. महादेवराव महाडिक हा जिल्ह्याचा जादूगार असल्याने निकाल सांगण्याची गरज नाही.” “राजाराम कारखान्याची निवडणूक आम्ही जिंकणार आहोत,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, संस्था गटातील 129 पैकी 90 मतदार आमच्या बाजूने आहेत. त्यामुळे या ठिकाणी आम्हीच विजयी होऊ असा दावाही त्यांनी यावेळी केला.
निवडणुकीत विरोधकांकडून अऩेक गावांमध्ये गोंधळ घालण्याचा, प्रलोभने आणि अमिषे दाखवण्याचा प्रयत्न झाला पण सभासदांनी त्यांनी भीक घातली नसल्याचा टोला खासदार धनंजय महाडिक यांनी लगावला आहे. माधवराव महाडिकांच्या नेतृत्वात आमचं सहकारी पॅनल कारखान्याच्या निवडणुकीत उतरलंय. 130 सदस्यांपैकी 90 सदस्य एकत्र येत मतदान करत असल्याचं ते म्हणाले आहेत.
माधवराव महाडिक यांच्या नेतृत्वात सहकार पॅनल मोठ्या मताधिक्क्याने निवडून येणार असून या निवडणुकीत विरोधकांचं डिपॉझिट जप्त होणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. माझ्यासाठी छत्रपती राजाराम कारखान्याची लढाई छोटी असून आमचा विजय आधीच निश्चित झालेला असल्याचं ते म्हणाले आहेत.