MP Medha Kulkarni’s anger : पुणे शहरातील रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत खासदार मेधा कुलकर्णी यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक धक्कादायक बाबी समोर आणल्या. वारंवार येणाऱ्या प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेत त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्याचे सांगितले आणि या पाहणीत रेल्वे स्थानकावरील व्यवस्थेतील अनेक त्रुटी समोर आणल्या. वारंवार येणाऱ्या प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेत त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्याचे सांगितले आणि या पाहणीत रेल्वे स्थानकावरील व्यवस्थेतील अनेक त्रुटी उघड झाल्याचा दावा केला.
कुलकर्णी यांनी सांगितले की, पुणे रेल्वे स्थानकावर सुरक्षा व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे. प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन प्रवेश केल्यानंतर देखील अनेकजण विना तिकीट फिरताना दिसत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. घटना घडल्यानंतरच त्रुटी लक्षात येतात, ही अत्यंत गंभीर बाब आहे, असे त्या म्हणाल्या. स्थानकावर कोणतीही तपासणी प्रभावीपणे होत नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.
पाहणीदरम्यान स्थानक परिसरात व्यसनाधीन व्यक्तींचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याचे देखील त्यांनी सांगितले. दारू आणि अंमली पदार्थांचे सेवन करणारे लोक सहजपणे स्थानकावर येत असल्याचे दिसून आले. यामुळे चोरी, अत्याचार आणि इतर गुन्ह्यांच्या घटना घडत असल्याचा आरोप त्यांनी केला. या सर्व प्रकारांसाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी त्या करणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केले.
रेल्वे प्रशासनावर निशाणा साधताना त्यांनी म्हटले की, संबंधित अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रारी देऊन देखील कोणतीही ठोस यंत्रणा कार्यरत नसल्याचे दिसते. आओ जाओ घर तुम्हारा अशी परिस्थिती सध्या रेल्वे स्थानकावर निर्माण झाली असल्याची टीका देखील त्यांनी केली. टीसी उपलब्ध नसणे, सुरक्षा तपासणीचा अभाव आणि पोलिसांचा हलगर्जीपणा ही परिस्थिती अधिकच गंभीर बनवत असल्याचे त्यांनी नमूद केले.
भाजपात प्रवेश करणार का? मतदानाचा हक्क बजावत तनपुरे स्पष्टच म्हणाले
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी निधी मिळाल्याचे समाधान असले तरी त्याचा प्रभावी वापर होत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, स्थानकावरील स्टोल्सच्या वाटपात देखील पारदर्शकतेचा अभाव असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. गरजू स्थानिकांना स्टॉल देण्याची व्यवस्था होऊ शकते का, याचा विचार केला पाहिजे. सध्या काही ठराविक ब्रँड्सनाच प्राधान्य दिले जात आहे, असे त्यांनी म्हटले.
याशिवाय स्थानकावरील कर्मचाऱ्यांमध्ये स्थानिक मराठीक लोकांचा अभाव असल्याचा मुद्दा देखील त्यांनी उपस्थित केला. काही मोजक्याच बाहेरील व्यक्ती काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. या सर्व त्रुटींबाबत सविस्तर अहवाल केंद्र सरकारकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांची लवकरच भेट घेऊन या समस्यांवर चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे देखील या सर्व अडचणी लेखी स्वरूपात मांडल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुणे रेल्वे स्थानकावरील वाढत्या गुन्हेगारी घटना, अपहरण, अत्याचार आणि चोरीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था तातडीने मजबूत करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आजपर्यंत ज्यांनी दुर्लक्ष केले, तेच यासाठी जबाबदार आहेत, असा थेट आरोप करत त्यांनी संबंधित अधिकारी आणि पोलिसांवर कारवाईची मागणी केली. एकूणच, पुणे रेल्वे स्थानकावरील कथित भोंगळ कारभार आणि सुरक्षेच्या त्रुटींवरून खासदार मेधा कुलकर्णी यांनी केंद्र सरकारकडे ठोस कारवाईची मागणी करत हा मुद्दा उच्चस्तरावर नेण्याचा इशारा दिला आहे.
