भाजपात प्रवेश करणार का? मतदानाचा हक्क बजावत तनपुरे स्पष्टच म्हणाले
Prajakt Tanpure : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरु असून निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार दुपारी एक पर्यंत
Prajakt Tanpure : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरु असून निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार दुपारी एक पर्यंत 29.60 टक्के मतदान पूर्ण झाले आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीत दरम्यान सर्वात जास्त चर्चेत राहणारे माजी आमदार प्राजक्त तनपुरे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची साथ सोडली असल्याची चर्चा राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. मात्र आज माध्यमांशी बोलताना त्यांनी मी पक्षाची साथ सोडली नसून आता देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी बोलताना प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) म्हणाले की, ही एक पोटनिवडणूक होती आणि या निवडणुकीत जिंकून देखील महायुती सरकारला काही फरक पडला नसता. तसेच मी कधीही असं म्हटलं नाही की, मी भाजपमध्ये प्रवेश करणार. ही चर्चा फक्त माध्यमांमध्ये सुरु आहेत. मी फक्त या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे कोणाच्या स्टेजवर देखील मी गेलो नाही. मी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचाच कार्यकर्ता आहे. विरोधी पक्षात असलो तरी विकास कामांसाठी सरकारची मदत मिळतेच. माझ्या भूमिकेमुळे मतदारसंघात काही विकासकामे होत असतील तर त्यात काही गैर नाही असं माध्यमांशी बोलताना तनपुरे म्हणाले.
ईडीची केस अन् निवडणुकीचा संबंध नाही
तर माध्यमांशी बोलताना तनपुरे यांनी साखर कारखाना खरेदी – विक्री प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहाराच्या खटल्यात लागलेल्या निकालावर देखील प्रतिक्रिया दिली. यावेळी तनपुरे म्हणाले की, ईडीची केस आणि या निवडणुकीचा बिलकुल संबंध नाही, वर्षभरापूर्वीच या केसमध्ये क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला होता. त्यावेळी कर्डीले साहेब देखील हयात होते आणि कुठलीही निवडणूक नव्हती.
स्वप्न, ताकद आणि जगण्यासाठीची झुंज! ‘सपने वर्सेस एवरीवन’ च्या नव्या सीझनचा दमदार ट्रेलर रिलीज
या प्रकरणात तीन महिन्यापूर्वी न्यायालयाने क्लोजर रिपोर्ट स्वीकारला होता आणि काल निकाल दिला. या प्रकरणात मी एकटा नव्हतो तर राज्यातील पन्नास जण आहेत आणि ही निवडणूक फक्त राहुरीत आहे. कालचा निकाल फक्त योगायोग आहे. ईडीने तारखा वाढवल्या नसत्या तर महिनाभरापूर्वीच हा निकाल आला असता असं माध्यमांशी बोलताना तनपुरे म्हणाले.