Download App

नगर शहरातील मेडिकल कॉलेज शिर्डीला नेण्याचा डाव…लंकेंचा अप्रत्यक्ष विखेंना टोला

MP Nilesh Lanke : केंद्र सरकारने मंजूर केलेले वैद्यकीय महाविद्यालय जर नगर शहरामध्ये झाले नाही तर आपण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा

MP Nilesh Lanke : केंद्र सरकारने मंजूर केलेले वैद्यकीय महाविद्यालय जर नगर शहरामध्ये झाले नाही तर आपण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा आज महाविकास आघाडीचे (MVA) खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी पत्रकारांशी बोलताना केली. दरम्यान मंजूर झालेले मेडिकल कॉलेज (Medical College) शिर्डी (Shirdi) या ठिकाणी होऊ देणार नाही असे म्हणत त्यांनी एक प्रकारे पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांचे नाव न घेता त्यांना सूचक इशारा दिला आहे. तसेच आपण जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन दिले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख जाधव, युवा सेनेचे राज्य सहशाची विक्रम राठोड, नगरसेवक योगीराज गाडे, प्राध्यापक सिताराम काकडे, रामेश्वर निमसे आदि यावेळी उपस्थित होते.

खासदार लंके म्हणाले मी ज्यावेळेस संसदेमध्ये गेलो त्यावेळेस पासून नगर शहरामध्ये वैद्यकीय महाविद्यालय व्हावे याकरता आवाज उठवलेला आहे. दोन वेळेला मी त्या संदर्भामध्ये केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे तसेच याकरता संबंधित मंत्र्यांना सुद्धा आपण भेटलो असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. वास्तविक पाहता हे मेडिकल कॉलेज म्हणजेच वैद्यकीय महाविद्यालय हे नगर शहरामध्ये होणे अत्यंत गरजेचे आहे.

शहरालगत जी काही दळणवळणाची सोय सुविधा आहे ती मिळाली पाहिजे तसेच जिल्हा रुग्णालयाचा सुद्धा या करता उपयोग झाला पाहिजे हे त्या मागचे कारण आहे. सध्या हे महाविद्यालय इतरत्र कुठल्यातरी तालुक्यात घालवण्याचा घाट हा कुणीतरी राजकीय व्यक्ती करत आहे किंवा सत्तेचा ते दुरुपयोग करत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी करत कोणत्याही प्रकारे अशा प्रकारचे महाविद्यालय उत्तर भागामध्ये किंवा इतरत्र जाऊ देणार नाही वेळप्रसंगी आपण आंदोलन करू उपोषण करू असा इशारा सुद्धा खासदार लंके यांनी यावेळी दिला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये हे महाविद्यालय दुसऱ्या तालुक्यामध्ये गेले नाही पाहिजे ही माझी स्पष्ट भूमिका आहे व यापुढे राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आपण या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना सुद्धा पत्र देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

हे वैद्यकीय महाविद्यालय नगर शहराजवळ व्हावे याकरता एक कमिटी सुद्धा केंद्र सरकारने पाठवलेले आहे, त्या कमिटीला सुद्धा आपण असा प्रस्ताव देणार आहोत तसेच शहर हे मध्यवर्ती केंद्र आहे त्यामुळे शहरांमध्ये सर्व सुविधा मिळू शकतात हा त्याचा भाग आहे अनेक जण पारनेर मध्ये सुद्धा हे महाविद्यालय व्हावे असे म्हणत होते पण ते दळणवळणाच्या दृष्टिकोनातून योग्य नाही, असे ते म्हणाले.

शहरालगत आहेत जागा

शहरामध्ये शासकीय जागा उपलब्ध असून इंद्रायणी हॉटेलच्या बाजूला पंचवीस एकर जागा आहे त्याचबरोबर विळद या ठिकाणी सुद्धा कृषी विभागाची जागा 25 ते 40 एकर आहे. त्याचप्रमाणे आरणगाव या ठिकाणी जे काही टीबी सेंटर उभारण्यात आलेलं होते ती सुद्धा आज जागा पडिक आहे त्याचा सुद्धा वापर या ठिकाणी होऊ शकतो अशा अनेक जागा शासनाच्या आहेत त्यामुळे त्या जागा शहरालगत असल्यामुळे त्याचा फायदा होईल या जागा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सुचवल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

विखेंना दिला सुचक इशारा

शिर्डी या ठिकाणी मेडिकल कॉलेज व्हावे त्यासाठी साईबाबा संस्थान यांचे सुद्धा हॉस्पिटल आहे असे सांगितले जाते मात्र हे काही संयुक्तिक नाही. नगर शहर हे मध्यवर्ती भाग आहे या ठिकाणी दळणवळण सोपे आहे त्यामुळे जर हे महाविद्यालय नगरमध्ये झाले नाही तर आपण निश्चितपणे आंदोलन उपोषण करू असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

दक्षिणेचे पदाधिकारी एक नाही

शासनाचे विविध योजना येतात विविध प्रकल्प येतात मात्र ते इतर जिल्ह्यांमध्ये सत्तेचा गैरवापर करून हलवले जातात ती सुद्धा वस्तुस्थिती आहे त्यामुळे एक प्रकारे दक्षिणेला पदाधिकाऱ्यांची इच्छाशक्ती एकत्र येत नाही अशी खंत सुद्धा खासदार लंके यांनी उपस्थित केली. मात्र आपण आता त्यासाठी स्वतः सर्व राज्यकर्ते तसेच पदाधिकारी यांची एकत्रितपणे भेट घेऊन या प्रश्नासंदर्भामध्ये बोलणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

विभाजन झाले तर चालेल

अहिल्यानगर जिल्हा हा सर्वाधिक भौगोलिक दृष्ट्या मोठ्या जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये बारा तालुके आहेत त्यामुळे या ठिकाणी जिल्हाधिकारी असो अथवा पोलीस अधीक्षक असो यांना काम करण्यासाठी वेळ असा पुरत नाही व त्यामुळे कामाचे नियोजन योग्य पद्धतीने होत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या नियोजनासाठी जर आपल्याला जिल्हा विभाजन झाले तर निश्चितपणे त्याचा उपयोग होईल मात्र दुसरीकडे जे कोणी हे करत नसेल किंवा ज्यांनी ते होणार नाही असं वक्तव्य केले असतील त्यांच्या वक्तव्यांकडे आपण न पाहता विभाजन झाले पाहिजे असे माझे मत असल्याचे ते म्हणाले.

पाकिस्तानसोबत क्रिकेट नाही, बीसीसीआय घेणार ‘हा’ मोठा निर्णय

ढवळपुरीच्या प्रकल्पात संदर्भात सुद्धा निर्णय घेऊ ढवळपुरी या ठिकाणी शेळी मेंढी पालन जे प्रकल्प राज्य सरकारने या ठिकाणी मंजूर केलेला होता तो सुद्धा उत्तर भागामध्ये वळवण्याचा प्रकार झाला हे सुद्धा योग्य नाही त्या संदर्भात सुद्धा आपण आवाज उठवू असे खासदार लंके म्हणाले.

follow us