Download App

अहिल्यानगरमध्ये केंद्रीय विश्वविद्यालयाची स्थापना करा! खासदार लंकेचे केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना साकडे

MP Nilesh Lanke Demands Central University : अहिल्यानगर (Ahilyanagar) लोकसभा मतदारसंघात केंद्रीय विश्वविद्यालयाची स्थापना करण्याची मागणी करत खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. महाराष्ट्रात सर्वसामान्यांसाठी एकही केंद्रीय विश्वविद्यालय नसताना खासदार लंके यांनी अहिल्यानगरमध्ये केंद्रीय विश्वविद्यालय स्थापना करण्याची औपचारिक मागणी केली आहे. दरम्यान काही दिवसापूर्वी नगर शहरात एक मेडिकल कॉलेज सुरु व्हावे, या मागणीसाठी देखील लंके यांनी पाठपुरावा (Central University Ahilyanagar) केला होता. आता त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी शिक्षण क्षेत्रासाठी एक प्रमुख मागणी केली आहे.

माजी आयुक्तांवर ईडीची कारवाई अन् खासदार राऊतांचे मंत्री भुसेंवर गंभीर आरोप

अहिल्यानगरमध्ये केंद्रीय विश्वविद्यालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी लंके यांनी गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही केली होती. दरम्यान सध्या सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने खासदार लंके हे दिल्लीमध्ये आहे. विश्वविद्यालयाची मागणी करतच लंके यांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची भेट घेतली. लंके यांनी मंत्री धमेंद्र प्रधान यांना निवेदनही सादर केले आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना प्रस्ताव सादर

संबंधित प्रस्तावात म्हटलंय की, शिक्षण हे कोणत्याही राष्ट्राचा कणा मानला जातो. अहिल्यानगर जिल्ह्यात विद्यार्थ्यांची संख्यात्मक वाढ आणि उच्च शिक्षणाची गरज लक्षात घेता, एका केंद्रीय विश्वविद्यालयाची स्थापनाही काळाची गरज आहे. महाराष्ट्रासारख्या विकसित राज्यात अद्याप एकही केंद्रीय विश्वविद्यालय नाही. वर्ध्यातील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ फक्त भाषिक अभ्यासापुरते मर्यादित असल्याकडेही खासदार लंके यांनी लक्ष वेधलं आहे.

मोदींना भाजपची गरज नाही! खासदार निशिकांत दुबेंचं स्फोटक विधान

लंके यांनी कर्नाटकातील गुलबर्गा, केरळातील कासारगोड, गुजरातमधील मोसमपुरा, राजस्थानमधील अजमेर येथे यशस्वीरित्या स्थापन झालेल्या केंद्रीय विश्वविद्यालयांचे उदाहरण देत सांगितलं की, अहिल्यानगरसारख्या शैक्षणिक दृष्टिकोनातून महत्वाच्या जिल्ह्यातही अशीच शैक्षणिक सुविधा असणे आवश्यक आहे.

आर्थिक, मानसिक ताण कमी होईल

विद्यापीठाच्या अभावामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठ्या शहरांकडे स्थलांतर करावे लागते. त्यामुळे आर्थिक भार वाढतोच, परंतु मानसिकदृष्टयाही अनेक अडचणी निर्माण होतात. केंद्रीय विद्यापीठ स्थापन झाल्यास विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण स्थानिक पातळीवरच उपलब्ध होईल, असा विश्वास खासदार लंके यांनी व्यक्त केला.

संशोधन, रोजगार आणि स्थानिक विकासाला चालना

खासदार लंके यांच्या मते हे विद्यापीठ शिक्षणापुरतेच मर्यादित न राहता, संशोधन, नवोन्मेष आणि कौशल्य विकासालाही चालना देईल. स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळेल. रोजगार निर्मिती वाढेल आणि पायभूत सुविधांची उभारणी होईल. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास सुनिश्चित होईल.

 

follow us