MP Shahu Maharaj : लोकराजा राजर्षी शाहू महाराजांचं छायाचित्र जाहिरातीत वापरणं टाळलं आहे. (Shahu Maharaj) यातून महायुतीचे सरकार शाहू-फुले-आंबेडकर यांचा विचार संपविण्याचा प्रयत्न करत आहे असे दिसते, असा प्रयत्न पुरोगामी कोल्हापूर शहर खपवून घेणार नाही, असा इशारा खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी दिला आहे.
राज्यात महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यानिमित्त भाजपने दिलेल्या जाहिरातीत महाराष्ट्रातील महापुरुषांची छायाचित्रे आहेत. पण, राजर्षी शाहू महाराजांचा फोटो नाही. याच्या निषेधार्थ कोल्हापुरातील शाहूप्रेमी, शाहू-फुले-आंबेडकर विचारधारा माणणाऱ्या विविध पक्ष, संस्था, संघटनांतर्फे शाहू समाधिस्थळासमोर महायुती सरकारच्या या कृती विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.
शाहू महाराजांना बाजूला सारणे खपवून घेणार नाही, शपथविधीच्या जाहिरातीवरून संभाजीराजे संतापले
शाहू महाराज म्हणाले, सरकारने राजर्षी शाहू महाराजांचे छायाचित्र प्रसिद्ध करण्याचे टाळले. हा विचार संपवण्याचा प्रयत्न आज पुन्हा एकदा झाला. असा प्रयोग सव्वाशे वर्षापूर्वी झाला होता. तेव्हाही राजर्षी शाहू महाराजांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले. मात्र, राजर्षी शाहू महाराजांनी त्यावर मात करून बहुजन हिताची कामे केली होती. म्हणून ते लोकराजा बनले. लोकांच्या मनात शाहू महाराज व त्यांच्या कार्याविषयीचा आदर आजही कायम आहे. त्या आदरला धक्का देण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. मात्र, तो यशस्वी होणार नाही.
माजी नगरसेवक राजेश लाटकर म्हणाले की, महायुती सरकार निवडणूक काळात फक्त शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेते हा मत मिळविण्याचा त्याचा उद्देश आहे. मात्र, मनुवादी विचारांच्या प्रभावाखाली असलेल्या सरकारमधील काही घटक या विचारविरोधी असल्याच्या थाटात असतात. लोकराजा असलेल्या शाहू महाराजांचे छायाचित्र वगळणे ही गंभीर चूक सरकारने केली आहे.
बाबा इंदूलकर यांनी जिल्ह्यातील दहा आमदार निवडून आले. त्यांच्यापैकी आज कोणीही उपस्थित नाहीत. ते शाहू महाराजांच्या भूमीतील मतांवर ते निवडून आले आहेत. शाहू महाराजांचे छायाचित्र ज्या सरकारकडून वगळले गेले त्याचा निषेध आमदाराकडून होत नाही ही गंभीर बाब असल्याचे सांगितले. शिवसेनेचे विजय देवणे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, भाकपचे दिलीप पोवार, चंद्रकांत यादव, शेकापचे संभाजी जगदाळे, श्रमिक संघाचे अतुल दिघे, डॉ. सुभाष जाधव, दगडू भास्कर, सुभाष देसाई, आदी उपस्थित होते.
सरकारने माफी मागावी
राजर्षी शाहू महाराजांचे छायाचित्र न वापर शासनाने घोडचूक केली आहे. आगामी काळातील राज्यभर त्याचे पडसाद उमठण्याची शक्यता आहे. झालेल्या चुकीबद्दल सरकारने माफी मागावी, अशी अपेक्षा खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी व्यक्त केली.