MPSC Exam 2025 Update Revised Schedule : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत दरवर्षी प्रमाणे या वर्षीही स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. विविध अपरिहार्य कारणांमुळे काही परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. उमेदवारांचे हित लक्षात घेऊन आयोगाने सुधारित दिनांक जाहीर केले आहेत. सर्व परीक्षा वेळापत्रकानुसारच घेतल्या जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलंय.
जा. क्र. ०१२/२०२५, जा. क्र. ११७/२०२५ आणि जा. क्र. १२४/२०२५ – परीक्षांच्या दिनांकाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.https://t.co/h76NBDFQF0
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) October 6, 2025
वेळेत जाहिरात आणि परीक्षा
आयोगाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक (MPSC Exam 2025 Update) ठरविताना इतर परीक्षा घेणाऱ्या संस्थांच्या तारखा विचारात घेऊन समन्वय साधला जातो. शासनाकडून वेळेत मागणीपत्र मिळाल्यास नियोजित वेळेत जाहिरात (MPSC Exam 2025) आणि परीक्षा आयोजित करता येते, असेही आयोगाने स्पष्ट केले.
सन 2025 च्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक दिनांक 22 नोव्हेंबर 2024 रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानुसार परीक्षा घेण्याचा आयोगाने काटेकोर प्रयत्न केला. मात्र काही अपरिहार्य कारणास्तव काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तरीदेखील सर्व परीक्षा वर्ष 2025 मध्ये घेण्यात आल्या असल्याचे आयोगाने नमूद केले आहे.
परीक्षा पुढे ढकलल्या
शासनाच्या सूचनेनुसार दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा 2024 ही परीक्षा स्थगित ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. आयोगाच्या वेळापत्रकानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ही परीक्षा 28 सप्टेंबर 2025 रोजी होणार होती. मात्र राज्यातील पूरपरिस्थितीमुळे ही परीक्षा आता रविवार, 9 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात येणार आहे.
सुधारित वेळापत्रक
त्याचप्रमाणे, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ही परीक्षा रविवार, 21 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात येईल. आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ही परीक्षा मूळ 30 नोव्हेंबर 2025 रोजी नियोजित होती. पण त्याच दिवशी संघ लोकसेवा आयोग (UPSC) ची परीक्षा असल्याने उपकेंद्रे उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे ही परीक्षा आता रविवार, 04 जानेवारी 2026 रोजी घेण्यात येणार आहे. आयोगाने सर्व उमेदवारांना सुधारित तारखांची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे. सुधारित वेळापत्रक व परीक्षा दिनांक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
महत्त्वाच्या तारखा:
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा : 9 नोव्हेंबर 2025
महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा : 21 डिसेंबर 2025
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा: 04 जानेवारी 2026
उमेदवारांना सूचना देण्यात आली आहे की, त्यांनी नियमितपणे आयोगाच्या संकेतस्थळावर लक्ष ठेवावे व सुधारित वेळापत्रकानुसार तयारी करावी.