Download App

चिंताजनक! एसटीच्या दैनंदिन उत्पन्नातील घट 5 कोटींवर; महसुलाचा आलेख घसरला

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पाच दिवसांत दैनंदिन उत्पन्नातील तूट पाच कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ही तूट 40 वर्षांतील सर्वात मोठी आहे

Mumbai News : आर्थिक अडचणीत सापडलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या महसुलाचा आलेख गेल्या दीड महिन्यापासून सातत्याने घसरत आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पाच दिवसांत दैनंदिन उत्पन्नातील तूट पाच कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ही तूट गेल्या चाळीस वर्षांतील सर्वात मोठी असल्याची चिंता महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केली आहे.

बरगे यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या भाडेवाढीनंतर एसटीला उद्दिष्टाप्रमाणे दररोज सुमारे 32 कोटी 36 लाख रुपये उत्पन्न मिळणे अपेक्षित होते. मात्र, ऑगस्टच्या पहिल्या पाच दिवसांत प्रत्यक्ष सरासरी उत्पन्न केवळ 27 कोटी रुपये इतके झाले असून या पाच दिवसांत सुमारे 25 कोटी रुपयांची तूट नोंदली गेली आहे.

दरवर्षी जून-जुलै महिन्यात सुट्टी संपून प्रवाशांची परतीची वर्दळ वाढल्याने चांगले उत्पन्न मिळते. मात्र यावर्षी या दोन्ही महिन्यांत उद्दिष्टांच्या तुलनेत महसूल कमीच राहिला. अशीच परिस्थिती पुढेही राहिली तर संचित तोटा वाढतच जाईल आणि आधीच 10 हजार कोटींच्या वर गेलेला तोटा एसटीसाठी धोक्याची घंटा ठरेल अशी भीती बरगे यांनी व्यक्त केली आहे.

एसटी महामंडळाच्या जागांचा विकास करा, पण पॅकेज पद्धत नकोच : श्रीरंग बरगेंची मागणी काय..

तिकीट विक्रीतील घटती प्रवासी संख्या हा केवळ बाह्य कारण सांगून व्यवस्थापन स्वतःची अकार्यक्षमता झाकत असल्याची टीकाही त्यांनी केली. गेल्या दीड महिन्यापासून सतत महसूल कमी होत असतानाही प्रभावी उपाययोजना न केल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. अजूनही कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेली अंदाजे 2,500 कोटी रुपयांची पीएफ आणि ग्रॅज्युटी रक्कम संबंधित ट्रस्टकडे जमा करण्यात आलेली नाही.

गणेशोत्सव तोंडावर असतानाही कर्मचाऱ्यांना उचल देण्यासाठी निधी नाही. दरमहा सरकारकडून मिळणाऱ्या सवलत मूल्य प्रतिपूर्ती रकमेतूनच वेतन देण्यात येत आहे. थकीत महागाई भत्ता व वेतनवाढीचा फरकही अद्याप दिलेला नाही. वाढत्या महागाईमुळे कर्मचारी त्रस्त झाले आहेत.

“या आर्थिक संकटातून मार्ग काढायचा असेल तर सरकारच्या आर्थिक मदतीसोबतच एसटीने स्वतः उत्पन्न वाढवण्यासाठी ठोस प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र, व्यवस्थापन हतबल आणि निष्क्रिय दिसत आहे. गोरगरिबांची एसटी वाचवायची असेल तर जनतेनेही आता जाब विचारला पाहिजे,” असे आवाहन बरगे यांनी केले.

इलेक्ट्रिक बस पुरवठादार कंपनीसमोर एसटी व्यवस्थापनाने पुन्हा एकदा गुडगे टेकले; श्रीरंग बरगे यांचा आरोप

follow us