लिव्ह-इन नात्याचा थरारक शेवट! प्रियकराकडून चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या; 20 दिवसांनी हत्येचा उलगडा

एका 22 वर्षीय तरुणाने आपल्या 29 वर्षीय लिव्ह इन पार्टनरची मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

Untitled Design 36

Untitled Design 36

Murdered by lover, strangled with charger wire : चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर परिसरात घडलेली ही घटना केवळ एक गुन्हा नसून, नात्यातील ताणतणाव, अतिविश्वास आणि हिंसाचार किती भयानक वळण घेऊ शकतो याचं अस्वस्थ करणारं उदाहरण ठरली आहे. एका 22 वर्षीय तरुणाने आपल्या 29 वर्षीय लिव्ह इन पार्टनरची मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, हा खून केल्यानंतर आरोपींची तो आत्महत्येचा प्रकार असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र, शवविच्छेदन अहवालाने या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला आणि पोलीस तपासाला निर्णायक वळण मिळालं.

या प्रकरणातील आरोपी अंकेष योगेश बहिरवार असून मृत महिलेचे नाव प्रियांका असे आहे. प्रियांका ही पतीपासून विभक्त राहत होती. याच काळात तिची ओळख अंकेशशी झाली आणि वयातील सात वर्षांच्या अंतरानंतर देखील दोघांमध्ये जवळीक वाढत गेली. ही ओळख प्रेमात बदलली आणि ते दोघे दुर्गापूर परिसरात एकत्र लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले.

सुरूवातीला सर्व काही सुरळीत असलं, तरी काही काळानंतर त्यांच्या नात्यात तणाव निर्माण होऊ लागला. किरकोळ कारणांवरून होणारे वाद वाढत गेले. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रियांका अंकेषवर काही बाबतीत दबाव टाकत होती आणि त्याला त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्यापासून रोखत होती. या सगळ्यामुळे अंकेष मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाला होता आणि नात्यातील तणाव टोकाला पोहोचला होता.

14 मार्चच्या रात्री या तणावाचा शेवट अत्यंत भयानक पद्धतीने झाला. वादाच्या भारत अंकेशने मोबाईल चार्जरच्या वायरने प्रियांकाचा गळा आवळला. तिचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर, स्वतःवर संशय येऊ नये म्हणून त्याने संपूर्ण प्रकाराला आत्महत्येचं रूप देण्याचा प्रयत्न केला. मध्यरात्री त्याने प्रियांकाच्या वडिलांना फोन करून ती प्रतिसाद देत नसल्याचे सांगितले आणि आत्महत्येचा संशय व्यक्त केला.

कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले तेव्हा प्रियांका बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. गालावरील खुणा पाहता सुरूवातीला हा आत्महत्येचा प्रकार असावा, असा अंदाज वर्तवण्यात आला आणि पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली. मात्र, सुमारे 20 दिवसांनी आलेल्या शवविच्छेदन अहवालाने या प्रकरणातील सत्य बाहेर आणलं. अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आलं की प्रियांकाचा मृत्यू गळा आवळल्याने झाला आहे. यानंतर संशयित अंकेशला ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

दुर्गापूर पोलिसांनी घटनास्थळावरून हत्येसाठी वापरण्यात आलेली मोबाईल चार्जरची वायर एक्स्टेंशन बोर्ड जप्त केले आहेत. आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे चंद्रपूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, लिव्ह इन रिलेशनशिपमधील वाढत्या असुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नात्यातील वाद संवादाने सोडवण्याऐवजी हिंसक मार्ग स्वीकारल्यास त्याचे परिणाम किती भीषण होऊ शकतात, याची ही घटना ठळक जाणीव करून देते. मृत प्रियांकाच्या कुटुंबीयांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.

Exit mobile version