Download App

‘मविआ’साठी युती सरकारचाच फॉर्म्युला; 2024 मध्ये घडतंय 29 वर्षांचं पॉलटिक्स..

मुख्यमंत्रिपदासाठी ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांनाच घोषित करावे यासाठी दबाव टाकला जात होता.

Maharashtra Elections 2024 : राज्यात विधानसभेच्या निवडणुका जवळ (Maharashtra Elections 2024) आल्या आहेत. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महविकास आघाडीने (MVA) जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मतदारसंघ आणि उमेदवारांची चाचपणी होत आहे. जागावाटपाचा निर्णय झाला नसला तरी चर्चेला मात्र तोंड फुटलं आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत ठाकरे गटाचा मेळावा झाला होता. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा त्याला माझा पूर्ण पाठिंबा असेल असे म्हंटले होते.

मात्र दोन्ही काँग्रेसने ठाकरेंची ही मागणी नाकारली होती. शरद पवार यांनी (Sharad Pawar) तर दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युलाच सांगून टाकला. निवडणुकीनंतर संख्याबळाच्या आधारावर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होईल असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंची मागणी पुन्हा एकदा नाकारल्याचे अर्थ काढले जाऊ लागले. आता शरद पवारांनी हे वक्तव्य महविकास आघाडीसाठी दिलं असलं तरी त्यांचा हा फॉर्म्युला महायुतीमधील भाजपला (BJP) समाधानकारक ठरू शकतो.

शरद पवारांनी सेट केला फॉर्म्युला

मुख्यमंत्रिपदासाठी मविआतील ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांनाच पुन्हा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून घोषित करावे यासाठी दबाव टाकला जात होता. परंतु शरद पवार आणि काँग्रेस दोघेही (Congress Party) यासाठी सहमत नव्हते. बुधवारी कोल्हापुरात असताना शरद पवार यांनी स्पष्टच करून टाकलं की महाविकास आघाडी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा प्रोजेक्ट करून निवडणुकीत जाणार नाही. जर राज्यात आघाडीचं सरकार आलं तर ज्या पक्षाचे सर्वाधिक संख्याबळ असेल त्याचा मुख्यमंत्री होईल असे त्यांनी स्पष्ट केले.

Sharad pawar : ‘विश्वजीतचं’ कौतुक अन् पाठीवर हातही, पवारांनी दिला खंबीर साथीचा शब्द…

युती सरकारचा फॉर्म्युला आघाडीने राबवला

तसं पाहिलं तर राज्याच्या आघाडीच्या राजकारणात हा फॉर्म्युला 1995 पासूनच राबवला जात आहे. यावेळी राज्यात शिवसेना-भाजप युतीने पहिल्यांदाच सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी हा फॉर्म्युला स्व. बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी तयार केला होता. पुढे 1999 मध्ये याच फॉर्म्युल्याच्या आधारावर काँग्रेसचा मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री बनला. यानंतर सन 2004 मध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) काँग्रेसपेक्षा जास्त जागा जिंकल्या. त्यामुळे मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार यात काही शंका नव्हती. मात्र शरद पवार यांनी त्यावेळी केंद्रात स्वतःला मनाप्रमाणे मंत्रालय आणि राज्यात आपल्या पक्षाला काही वजनदार खाती पदरात पाडून मुख्यमंत्रिपद काँग्रेसला दिले होते.

सन 2009 मधील निवडणुकीत उलटफेर होऊन काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या. यावेळी पुन्हा काँग्रेसचाच मुख्यमंत्री बनला. आताही शरद याच फॉर्म्युल्यानुसार आगामी निवडणुकाना सामोरे जाण्याचे सांगत आहेत.

महायुतीत CM पदाचा दावेदार कोण?

सत्ताधारी महायुतीसाठी देखील हाच फॉर्म्युला समाधानकारक ठरू शकतो. कारण महायुतीत आजही भाजपच्या जागा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा जास्त आहेत. महायुतीत अजूनही मुख्यमंत्रिपदासाठी कोणत्याही पक्षाकडून पुढाकार घेण्यात आलेला नाही. राज्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याच नेतृत्वात विधानसभा निवडणुकांची तयारी भाजपकडून केली (Elections 2024) जात आहे. फडणवीस यांच्याच नेतृत्वात 2019 मधील निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा मिळवल्या होत्या. आता या निवडणुकीत जर पुन्हा महायुतीची सत्ता आली तर कार्यकर्ते फडणवीस यांनाच पुन्हा मुख्यमंत्री म्हणून पाहण्यास इच्छुक आहेत.

राष्ट्रवादीचा 60 जागांवर दावा

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने दोन्ही पक्षांचं संख्याबळ कमी झालं आहे. त्यामुळे महायुतीतील जागावाटपात भाजपाचं पारडं जड राहण्याची शक्यता दिसत आहे. अजित पवार यांनी (Ajit Pawar) काही दिवसांपूर्वी 60 जागा लढण्यास तयार असल्याचे सांगितले होते. याच फॉर्म्यु्ल्यावर एकनाथ शिंदे देखील सहमत होतील असे सांगितले जात आहे.

राष्ट्रवादीच्या दोन रूपालींमध्ये रंगला ‘आमदारकीवरुन’ वाद …. 

मागील विधानसभा निवडणुकीत अविभाजित शिवसेनेने 124 पैकी 56 जागा जिंकल्या होत्या. भाजपने 152 जागा लढवू 105 जिंकल्या होत्या. जिंकण्याची टक्केवारी भाजपाची जास्त होती. याच तर्काच्या आधारावर भाजप यंदा जास्त जागांची मागणी करण्याची शक्यता आहे. यातून जास्त जागा जिंकून मुख्यमंत्रि‍पदावर दावा करण्याचाही भाजपाचा प्लॅन राहिल अशी शक्यता नाकारता येत नाही.

follow us