Maharashtra Elections : विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत (Maharashtra Elections) तशा राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी घडू लागल्या आहेत. महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीत नेत्यांचं (MVA) इनकमिंग वाढलं आहे. त्यातही शरद पवार गटाकडे इच्छुकांचा ओढा वाढला आहे. महायुतीतील भाजपात मोठी गळती (BJP) लागली आहे. अनेक ने्त्यांनी पक्ष सोडला आहे तर काही नेते लवकरच सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाच्या चर्चा जोरात सुरू झाल्या आहेत. यातच आता भाजपला धक्का देणारी आणखी एक बातमी आली आहे.
राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित (Vijay Kumar Gavit) यांचे बंधू भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आता कोणत्याही परिस्थितीत शहादा-तळोदा मतदारसंघातून निवडणूक लढणारच अशी घोषणा राजेंद्रकुमार गावित यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानंतर पुढील टप्प्यात त्यांनी पक्षातील पदांचा राजीनामा दिला आहे.
Ground Zero : बांगरांच्या आमदारकीवर नांगर फिरणार? ठाकरेंकडे चार तगडे पर्याय
विधानसभा निवडणूक लढण्यासाठी भाजपात अनेक जण इच्छुक आहेत. अजित पवारांची महायुतीत एन्ट्री झाल्याने भाजपाच्या अनेक नेत्यांना तिकीटाची शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे त्यांच्याकडून अन्य पक्षांत उमेदवारी मिळते का याचा शोध सुरू झाला आहे. भाजपातील परिस्थिती खराब होत चालली आहे. राजेंद्रकुमार गावित यांनी निवडणूक लढण्याची घोषणा केल्याने डोकेदुखी वाढली आहे. आता गावित कोणत्या पक्षात प्रवेश करून उमेदवारी मिळवणार की अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार याचं उत्तर लवकरच मिळणार आहे. परंतु, ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजेंद्र गावित यांनी राजीनामा दिल्याने भाजपला मोठं खिंडार पडल्याचं बोललं जात आहे.
शहदा तळोदा या मतदारसंघातून निवडणूक लढण्याची घोषणा राजेंद्रकुमार गावित यांनी केली होती. परंतु, याच मतदारसंघातून अजित पवार गटाचे जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे यांनीही उमेदवारीसाठी तयारी सुरू केली आहे. शेवाळे यांनी तळोदा तालुक्यात कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेतला होता. तसेच त्यांनी संवाद यात्राही सुरू केली असून मतदारसंघातील कार्यकर्ते आणि नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत. अबकी बार स्थानिक आमदारअशी घोषणा त्यांनी दिली आहे. त्यामुळे महायुतीतील धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे.
Elections Results : नाशिक, जळगाव, नंदूरबार अन् धुळ्यात कुणाची आघाडी? वाचा एका क्लिकवर..
राजेंद्रकुमार गावित देवमोगरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे ते भाऊ आहेत. याआधीची लोकसभा निवडणूक लढण्यासही त्यांनी तयारी केली होती. मुलाखतही दिली होती. इतकेच नाही तर 2014 मध्ये शहादा तळोदा या मतदारसंघात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणुक लढली होती. परंतु, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. 2019 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता. मात्र 2019 च्या निवडणुकीत भाजपने त्यांना तिकीट दिले नाही. आताच्या निवडणुकीत भाजप त्यांना तिकीट देईल याची शक्यता कमीच आहे. त्यामुळेच राजेंद्रकुमार गावितांनी राजीनामास्त्र बाहेर काढल्याची चर्चा आहे.