Ground Zero : बांगरांच्या आमदारकीवर नांगर फिरणार? ठाकरेंकडे चार तगडे पर्याय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर हमसून हमसून रडलेले संतोष बांगर (Santosh Bangar) सगळ्यांनाच आठवत असतील. शिंदे गुवाहटीला गेल्यानंतर आमदार बांगर यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. आपण तुमच्यासोबतच आहोत आणि शेवटपर्यंत तुमच्यासोबतच राहू असा शब्द दिला. त्यानंतर ते हिंगोलीमध्ये गेले, बंडखोरांविरोधात मोठा मोर्चा काढला. निष्ठावंत म्हणून शिवसैनिकांनी बांगर यांची जंगी मिरवणूक काढली. तिथेच जनसमुदायासमोर बांगर हमसून हमसून रडले. मतदारसंघात आक्रमक भाषण करत प्रचंड सहानुभूती मिळवली. तिथून अवघ्या दहा दिवसात बांगर यांनी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात थेट एकनाथ शिंदेंसोबत एन्ट्री घेतली आणि त्यांच्या बहुमतासाठी मतदानही केले. (Who will be the candidate of Shiv Sena’s Uddhav Balasaheb Thackeray party against Shiv Sena’s Santosh Bangar in Kalmanuri assembly constituency?)
तेव्हापासून संतोष बांगर यांच्या या भुमिकेची मतदारसंघात अनेकदा चर्चा होते. मतदारसंघातील गावात गेल्यानंतर त्यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. त्यांची हेटाळणी केली जाते. थोडक्यात मतदारांना त्यांची भूमिका फारशी आवडली नाही. लोकसभेलाही हिंगोली मतदारसंघात महायुतीचे पाच आमदार असतानाही ठाकरे यांच्या शिवसेनेचे नागेश पाटील आष्टीकर विजयी झाले आहेत. या विजयात बांगर यांच्या कळमनुरीमध्येही आष्टीकर यांना घसघशीत लीड आहे. त्यामुळेच यंदा संतोष बांगर यांच्या आमदारकीवर नांगर फिरु शकतो, असे बोलले जात आहे. उद्धव ठाकरे हेही बांगर यांच्याविरोधात तेवढाच तगडा उमेदवार मैदानात उतरविण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे कळमनुरी मतदारसंघातील यंदाची निवडणूक चुरशीची होणार हे नक्की आहे.
लेट्सअप मराठीच्या ग्राऊंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरीजमध्ये पाहु कळमनुरी मतदारसंघात काय आहे परिस्थिती…?
कळमनुरी मतदारसंघांत मुस्लीम, आदिवासी, बंजारा, हटकर या समाजाचे मोठे प्राबल्य आहे. यातील हटकर आणि आदिवासी समाजाच्या मतांवर माकपचे विठ्ठल नाईक हे तीनवेळा आमदार झाले. कळमनुरी मतदारसंघ हा काँग्रेसचाही बालेकिल्ला. रजनी सातव, राजीव सातव यांनी याच मतदारसंघातून निवडून येत विधानसभा गाजवली. मराठवाड्यातील धार्मिक वातावरणाचा फायदा उचलत शिवसेनाही इथे वाढली. 1999 साली परभणी जिल्ह्यातून हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेचे गजानन घुगे निवडून आले. 2004 मध्येही घुगे यांनी दुसऱ्यांदा विधानसभा गाठली.
या मतदारसंघातील गत निवडणुकींचा विचार केल्यास 2009 मध्ये राजीव सातव यांनी 10 हजार मतांनी गजानन घुगे यांचा पराभव केला. 2014 च्या निवडणुकीमध्ये राजीव सातव यांनी खासदारकीसाठी उडी घेतल्याने त्यांच्या ठिकाणी काँग्रेसकडून संतोष टारफे हे आमदार झाले.टारफे यांनी शिवसेनेचे गजानन घुगे यांचा अवघ्या 300 मतांनी घासून पराभव करुन विजय मिळवला. टारफे हे काँग्रेसचे उमेदवार असल्याने आणि आदिवासी समाजाचे असल्याने त्यांना मुस्लीम आणि आदिवासी मतदारांनी भरभरुन मतदान केले.
Ground Zero : अकोलेमध्ये पिचड-लहामटेंचे काय होणार? शरद पवारांनी शोधलाय तगडा पर्याय!
2019 च्या निवडणुकीपूर्वी घुगे यांचा दोनवेळा पराभव झाल्याने शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असलेल्या संतोष बांगर यांना संधी दिसू लागली. शेतकऱ्यांचे, आदिवासी समाजाचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करत ते मतदारांपर्यंत पोहचले. ठाकरे यांनीही बांगर यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना तिकीट दिले. त्यावेळी 82 हजार मते मिळवत बांगर निवडून आले. तर वंचित बहुजन आघाडी पक्षाचे उमेदवार अजित मगर यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. काँग्रेसचे संतोष टारफे थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.
आता गत अडीच वर्षांमध्ये समीकरणे बदलली आहेत. बांगर यांनी शिंदेंची साथ देताच संतोष टारफे आणि अजित मगर यांनी मातोश्री गाठून शिवबंधन बांधले होते. आता दोघेही ठाकरे गटातच आहेत. दोघेही बांगर यांना तगडे पर्याय ठरु शकतात. मगाशी सांगितल्याप्रमाणे कळमनुरी मतदारसंघात आदिवासी मतदारांची संख्या अधिक आहे. टारफे यांच्याकडे आदिवासी युवक कल्याण संघटनेच्या माध्यमातून समाजाचे चांगले नेटवर्क आहे. आदिवासी समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. आजही ते या संघटनेचे राज्याध्यक्षपदी आहेत. आदिवासी समाजात त्यांना मानाचे स्थान आहे. याच्याच जोरावर त्यांनी 2014 मध्ये काँग्रेसकडून विधानसभेची निवडणूक लढवली आणि ती जिंकलीही.
अजित मगर हे कळमनुरी तालुक्यातील रहिवासी आहेत. ते दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या अत्यंत विश्वासातले होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सातव यांचे हिरिरीने काम केले होते. विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी हिंगोली जिल्हा परिषदमध्ये काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी केली. जिल्हा परिषदेच्या वाकोडी गटातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून बहुमताने ती निवडणूक जिंकली. 2019 मध्ये ही त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. आता यंदा त्यांनाही विधानसभेची निवडणूक लढायची आहे. शिवाय जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक भिसे पाटील हेही कळमनुरी विधानसभा मतदारसंघासाठी तयारी करत आहेत. विनायक भिसे यांचा कळमनुरीमध्ये चांगला संपर्क आहे. त्यामुळे बांगर यांच्याविरोधात ठाकरे यांच्याकडे चार पर्याय असल्याचे दिसून येते.
Ground Zero : जे. पी. गावितांसाठी लढाई सोपी; पवारांच्या घरातून आमदारकीही जाणार?
ठाकरे यांना लोकसभेवेळीच विधानसभेचाही कॉन्फिडन्स आला आहे. काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव निवडणूक प्रचारापासून काहीशा अलिप्त होत्या. आष्टीकर यांच्या प्रचारात त्या कुठेही सहभागी झाल्याचे समोर आले नव्हते. तरीही काँग्रेस पक्षाने ठाकरेंना साथ दिली होती. जून 2024 अखेर त्यांची विधान परिषदेची मुदत संपुष्टात येणार होती. त्यामुळे आष्टीकर यांना कळमनुरीमधून मताधिक्य न मिळाल्यास ही जागा आपल्याकडे खेचून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे बोलले गेले होते. तरीही कळमनुरी मतदारसंघात ठाकरे गट, शरद पवार गट आणि व काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या यशस्वी प्रयत्नामुळे आष्टीकर यांना 21 हजारांहून अधिक मताधिक्य मिळाले. आता सातव यांना पुन्हा विधान परिषदेवर संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता ही जागाही ठाकरे यांनाच सुटणार हे स्पष्ट मानले जात आहे.
दुसऱ्या बाजूला महायुतीमध्ये ज्याचा आमदार त्याची जागा या सुत्रानुसार ही जागा शिवसेनेलाच सुटेल असे दिसते. सोबत आलेल्या सहकाऱ्यांना डावलायचे नाही असा एकनाथ शिंदे यांचा निर्धार आहे. त्यामुळे संतोष बांगर हेच पुन्हा उमेदवार असतील. पण बांगर यांच्याविरोधातील मतदारसंघातील एकूणच चित्र, त्यांना स्थानिक पातळीवर सामान्य लोकांकडूनच होणारा विरोध या गोष्टी लक्षात घेता भाजप ही जागा मागून घेऊ शकते. माजी आमदार गजानन घुगे आज भाजपमध्ये आहेत. भाजपचे ते उपाध्यक्ष आहेत, अल्पवाधीतच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक साधली आहे. त्यामुळे कळमनुरी मतदारसंघ भाजपकडे आल्यास गजानन घुगे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडू शकते.
आता या सगळ्या साठमारीत विजयाची आणि आमदारकीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे…