“एकनाथ शिंदेंना ‘लॉटरी’ नाही ‘मटका’ लागला”, मंत्री नाईकांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राऊतांचा चिमटा

Sanjay Raut replies Ganesh Statement : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना लॉटरी लागली पण कमावलेलं टिकवता आलं पाहिजे असा टोला राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी लगावला होता. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या वक्तव्यावर एकनाथ शिंदेंना खोचक टोला लगावला आहे. एकनाथ शिंदेंना लॉटरी नाहीतर मटका लागला असा चिमटा संजय राऊत यांनी काढला.
गणेश नाईक आधी शिवसेनेतच होते. शिवसेनेच्या पहिल्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते. एकनाथ शिंदे यांचा राजकारणात उदयही झाला नव्हता तेव्हापासून नाईक राजकारणात आहेत. ही खरी गोष्ट आहे. त्यामुळे मार्गदर्शन करण्याचा अधिकार गणेश नाईक यांना नक्की आहे. गणेश नाईक एकेकाळी आमचे सहकारी होते. ते अत्यंत संयमी आहेत. ते पक्ष सोडून गेले त्यानंतर आम्ही त्यांच्यावर अनेकदा टीका केली पण त्यांनी कधीही संयम सोडून आमच्यावर प्रतिटीका केली नाही. हे पथ्य त्यांनी पाळलं आणि ते अत्यंत महत्वाचं असतं.
“एक-दोन जिल्ह्यांत पालकमंत्रिपदावरून नाराजी, आता मुख्यमंत्री..”, विखे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
काल कुणाला तरी लॉटरी लागली आणि ते मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले. लॉटरी हा एक प्रतिष्ठित शब्द आहे. महाराष्ट्र सरकारही कधीकाळी लॉटरी चालवत होते. पण आज राज्यात बेकायदेशीर मटका सुरू आहे. फडणवीस जरी मुख्यमंत्री असले तरी आकडा लावला जातो. तेव्हा कदाचित गणेश नाईक हे सभ्य आणि संस्कारक्षम असल्याने त्यांनी लॉटरी हा शब्द वापरला पण त्यांच्या डोक्यात मटका असेल.
मटक्याचा आकडा सांभाळला पाहिजे पण मटक्याचे आकडे चंचल असतात. लोकं चार चार मटके चालवतात. एकेकाळी गुन्हेगारी क्षेत्रात मी पत्रकारिता केली म्हणून मला हे माहिती आहे. मटक्याचे आकडे चंचल असतात. हे आकडे सांभाळता येणार नाही. त्यांच्या मटक्याचा आकडा काढणारा दिल्लीत बसलाय. ते जाऊन तिथे आकडा लावायचा प्रयत्न करतात. पण सध्या आकडा लागत नाही. हे सांभाळणं कठीण असतं, लवकरच यांचा आकडा अस्तंगत होईल असे संजय राऊत म्हणाले.
Video : मुख्यमंत्री असताना शिंदेंनी मिळवलेला पैसा भाजपने कसा वापरला?, वडेट्टीवारांचे वादळी खुलासे
काय म्हणाले होते गणेश नाईक?
आधी पालघरसह एकत्रित असलेल्या ठाणे जिल्ह्याचा मी पालकमंत्री होतो. त्यावेळी विष्णू सावरा, खासदार चिंतामण वनगा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत असायचे. विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा त्या बैठकीत असायचे. पण त्यांना लॉटरी लागली ही आनंदाची गोष्ट आहे. प्रत्येकाच्या नशिबाचा खेळ आहे. प्रत्येकालाच लॉटरी लागते असे होत नाही. पण कमावलेलं टिकवता आलं पाहिजे. कमावलेलं तुम्ही कसं टिकवता यावर जनसामान्यांची नजर असते, असे वक्तव्य वनमंत्री गणेश नाईक यांनी पालघरमधील दुर्वेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजनावेळी केले.