Ground Zero : जे. पी. गावितांसाठी लढाई सोपी; पवारांच्या घरातून आमदारकीही जाणार?
महाराष्ट्रात हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच तालुक्यांमध्ये, मतदारसंघांमध्ये डाव्या चळवळीचा लाल झेंडा डौलाने फडकत आहे. यातीच एक मतदारसंघ म्हणजे कळवण-सुरगाणा. गुजरातच्या सीमेला लागून असलेल्या या आदिवासी बहुल मतदारसंघात जेवढा माकपचा जोर आहे तेवढीच पवार घराण्याची ताकद आहे. गावित विरुद्ध पवार हा इथला पारंपारिक संघर्ष. यात कधी गावित बाजी मारतात तर कधी पवार घराणे. यंदा पुन्हा एकदा हाच सामना रंगण्याची शक्यता आहे… यात नेमकी कोण बाजी मारु शकते? कोणाची किती ताकद आहे? (NCP’s Nitin Pawar vs CPI(M)’s J. P. gavit will fight in In Kalwan-Surgana Assembly Constituency.)
पाहुया लेट्सअप मराठीच्या ‘ग्राऊंड झिरो’ या निवडणूक स्पेशल सिरीजमध्ये…
कळवण-सुरगाणा हे दोन तालुके. यापूर्वी हे दोन्ही मतदारसंघही वेगळे होते. सुरगाणामध्ये माकपची पाळेमुळे घट्ट रुजली आहेत. गावित यांना या तालुक्यात अजूनपर्यंत तरी तगडा प्रतिस्पर्धी सापडलेला नाही. त्यामुळेच मतदारसंघ वेगळा असताना जीवा पांडू गावित अर्थात जे. पी. गावित (J.P. Gavit) इथून तब्बल सातवेळा आमदार झाले. यंदा ते आठव्यांदा विधानसभा गाठण्यासाठी तयारी करत आहेत.
ज्याप्रमाणे सुरगाणामध्ये माकपची ताकद आहे, अगदी त्याचप्रमाणे कळवण तालुक्याला पवार घराण्याने आपला बालेकिल्ला बनविले आहे. कळवण मतदारसंघ वेगळा असताना 1985 चा अपवाद वगळता ए.टी. पवार इथून तब्बल आठवेळा आमदार म्हणून निवडून आले होते. ए. टी.पवार (A.T. Pawar) यांनी आपल्या आमदारकीच्या काळात अनेक विकासाची कामे केली. पुनंद धरणाची निर्मितीही त्यांच्या काळातच झाली. तर शासकीय इमारतींसह अनेक विकासकामे करत त्यांनी कळवण मतदारसंघामध्ये आपली छाप पाडली होती.
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग… शिरीष कोतवाल पुन्हा आमदार होणार?
2009 साली मतदार संघाची पुर्नरचना झाली. त्यात कळवण-सुरगाणा मतदार संघ एक झाला. त्यामुळे कोणत्या तालुक्याचा नेता विजयी होणार अशी एक स्पर्धाच सुरु झाली. या लढतीत पहिल्यांदा ए.टी.पवार विजयी झाले. 2014 साली मात्र गावित यांनी डावपेच खेळले. पवार यांना घेरण्यासाठी त्यांनी कळवण मधूनच उमेदवार उभे केले. गावित यांचा हा डाव यशस्वी झाला. सुरगाणा या गावितांच्या बालेकिल्ल्यातील एकगठ्ठा मतदान त्यांच्या पारड्यात पडले. तर कळवणमध्ये पवारांची मते विभागली गेली. अवघ्या चार हजार मतांनी गावित विजयी झाले.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत ए. टी. पवार यांच्या स्नुषा भारती पवार खासदार झाल्या. पण त्यांना कळवणमधून मताधिक्य मिळाले नव्हते. यामागे आपल्याच घरातील भेदी असल्याची शंका त्यांना होती. त्यानंतर त्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ए.टी. पवार यांचे सुपुत्र नितीन पवार यांना मैदानात उतरले. परंपरेप्रमाणे टफ फाईट झाली. पण निवडणुकीच्या शेवटच्या काही दिवसात भारती पवार यांनी आपली ताकद जे. पी. गावित यांच्यामागे लावल्याची चर्चा होती. मात्र अवघ्या सहा हजार मतांनी नितीन पवार आमदार झाले.
आता यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही भारती पवार यांना कळवण-सुरगाणामधून मताधिक्य मिळालेले नाही. त्यामुळे आता त्या काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीकडून सध्या तरी नितीन पवार यांचीच उमेदवारी निश्चित मानली जात आहे. कळवण तालुक्यातील विविध संस्थांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात तसेच ए. टी. पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. नितीन पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मोठा निधी कळवण तालुक्यासाठी आणला आहे. त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो. युती न झाल्यास भाजपाकडून एन. डी. गावित किंवा माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचा मुलगा समीर चव्हाण हे दावेदार आहेत.
Nashik : लोकसभेला हवा फिरली… विधानसभेला नाशिक भाजपच्या हातून जाणार?
नितीन पवार यांच्यासाठी जशा जमेच्या बाजू आहेत तशाच नकारात्मक बाजूही आहेत. भारती पवार विरुद्ध नितीन पवार यांच्यातील छुपा संघर्ष ही पहिली नकारात्मक बाजू. दुसरी म्हणजे नितीन पवार यांनी आमदार झाल्यावर ऑनलाईन उद्घाटनांचा धडाका लावला, परंतु ती तशीच रेंगाळत ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर होतो. मतदारसंघातील कांद्याच्या प्रश्नामुळेही जनतेत प्रचंड नाराजी दिसून येते. तालुक्यातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे झालेली चाळण हा प्रश्नही मतदारांच्या नाराजीचे प्रमुख कारण आहे. याशिवाय वनाधिकार कायद्याविरोधात भूमिका घेत आदिवासी फॉरेस्ट प्लॉटधारकांच्या विरोधातील भूमिका घेतली, विकासकामांकडे दुर्लक्ष केले, असे मतदारसंघातील लोकांचे मत आहे. या सगळ्यामुळे जे. पी. गावित यांना तुलनेने लढत सोपी मानली जात आहे. महाविकास आघाडीतून मदत झाल्यास त्यांच्यासाठी विधानसभा आठव्यांदा दूर नाही, हे नक्की.