अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली आहे. काँग्रेसकडून आमदार डॉ. सुधीर तांबे निवडणूक लढविणार हे स्पष्ट आहे. मात्र भाजपकडून उमेदवार निश्चित झालेला नाही. भाजपचा उमेदवार कोण असेल याबाबत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार राम शिंदे यांनी सूचक विधान केले आहे.
राम शिंदे म्हणाले, नाशिक पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करत असताना त्याच्यावर विचार विनिमय सुरु आहे. आमच्यासमोर अनेक नाव आहेत, त्यापैकी वेगवेगळी मतमतांतर समोर येत असल्याकारणाने विलंब होत आहे. पाच जिल्ह्यांचा व्याप असल्यामुळे आणि ही निवडणूक जिंकण्याच्या दृष्टिकोनातून नेतृत्व त्याच्यावर चर्चा करत आहे. आज अथवा उद्या भाजपचा नाशिक पदवीधर मतदार संघाचा उमेदवार जाहीर होईल.
आमच्याकडे राजेंद्र विखे , मीनाक्षी पाटील , धनंजय विसपुते ही नावे आहेत. यापेक्षाही वेगळ काहीतरी नाव येऊ शकते. नाशिक पदवीधरसाठी अनपेक्षित उमेदवार असू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, पंकजा मुंडे यांना पक्षात डावललं जात नाही, हे त्याही सांगतात आणि आम्हीही सांगतो. मात्र निवडणुकीत पराजय झाल्यानंतर पक्ष ज्याची त्याची व्यवस्था ज्या त्या ठिकाणी करत असतो.
त्यांना राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये सचिव पदाचा दर्जा दिलेला आहे. प्रत्येकाची वेळ आणि काळ येतो. योग्य वेळी योग्य विचार निश्चित स्वरूपामध्ये होईल. शेवटी त्या कै. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत आणि त्या ऍक्टिव्ह पण आहेत. मोठी संघर्ष यात्रा काढून त्यांनी स्वतःला सिद्ध देखील केलेलं आहे. त्यामुळे चढ- उतार हा राजकारणामध्ये असतोच त्यामुळे योग्य वेळी योग्य माणसाचा विचार करणारा भारतीय जनता पक्ष आहे, असे त्यांनी सांगितले.