Nashik TCS Case Update : नाशिकमधील नामांकित TCS आयटी कंपनीत तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान सध्या फरार असून, तिच्या अटकेसाठी पोलिसांचे शोधपथक सक्रिय आहे. दरम्यान, निदाच्या वकिलांनी केलेल्या खळबळजनक दाव्यांमुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळाले आहे.
निदा खान ‘HR’ नाही तर, ‘टेलिकॉलर’
आतापर्यंत निदा खान ही नाशिक TCS कंपनीत ‘HR मॅनेजर’ म्हणून काम करत असल्याचे आणि त्याच पदाचा वापर करून ती कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचे बोलले जात होते. मात्र, निदा ही कंपनीत एचआर (HR) म्हणून नव्हे तर, टेलिकॉलर/डायलर म्हणून काम करत होती असा धक्कादायक दावा वकिलांनी कोर्टात केला आहे. या दाव्यामुळे कंपनीतील निदाचे नेमके अधिकार काय होते आणि तिने आपल्या पदाचा गैरवापर केला का, याबाबतचा संभ्रम आता वाढला आहे.
मुंबई कनेक्शन आणि ट्रान्सफरचा ‘बनाव’ की वास्तव?
निदा खानच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये हे प्रकरण उघडकीस येण्यापूर्वीच तिने मुंबईत बदली घेतली होती. तिचे लग्न मुंबईतील एका तरुणाशी झाले असून, तिने कौटुंबिक कारणास्तव मुंबईतील मुलुंड कार्यालयात बदली मागितली होती. कंपनीने तिची विनंती मान्य केली होती. एवढेच नव्हे तर, ती नाशिकमध्ये हे प्रकरण गाजण्यापूर्वीच मुलुंडच्या ऑफिसमध्ये रुजू झाली होती, असा दावा वकिलांनी केला आहे. यामुळे निदाने कारवाई टाळण्यासाठी हा ट्रान्सफरचा बनाव रचला होता का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
निदा खान प्रेग्नंट?
संशयित निदा खान सध्या पसार आहे, मात्र तिने आपल्या वकिलांमार्फत नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जात तिने आपण ‘गरोदर’ असल्याचे नमूद केले आहे. वैद्यकीय कारणास्तव आणि गरोदरपणामुळे तिला अटकपूर्व दिलासा मिळावा, अशी विनंती वकिलांनी कोर्टाकडे केली आहे.
पोलिसांची भूमिका आणि पुढील तपास
धर्मांतर आणि लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर प्रकरणात निदा खानचा सहभाग महत्त्वाचा मानला जात आहे. मुख्य संशयित दानिश याला तिने कशा प्रकारे मदत केली, याचा शोध SIT घेत आहे. पोलीस अद्याप तिच्या मुंबईतील किंवा नाशिकमधील मूळ घरी पोहोचू शकले आहेत की नाही, याबाबत गुप्तता पाळली जात आहे. एका उच्चशिक्षित तरुणीने आयटी कंपनीत काम करत असताना अशा प्रकारच्या कृत्यात सहभाग घेतल्याने आयटी क्षेत्रात खळबळ उडाली असून, निदा खानची ‘HR’ ही ओळख खरी की ‘टेलिकॉलर’ हा केवळ बचावाचा पवित्रा, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
