Gokul Gite Support To Narendra Darade In Nashik : नाशिक विधान परिषद निवडणुकीत शेवटच्या क्षणापर्यंत महायुतीच्या उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासमोर ‘काटेरी आव्हान’ उभे करणारे गोकुळ गीते यांनी अखेर निवडणुकीतून माघार घेतली आहे. महायुतीला सळो की पळो करून सोडणाऱ्या गीतेंनी अचानक दराडे यांना पाठिंबा जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र, या माघारीमागे केवळ राजकीय समजुतदारपणा नसून, गेल्या काही दिवसांपासून पडद्यामागे सुरू असलेल्या हालचाली आणि दबावाचे मोठे ‘नेटवर्क’ असल्याचे स्पष्ट होत आहे.
गीते यांच्या माघीरीची नेमकी कारण काय?
गोकुळ गीते यांच्या माघारीचा प्रवास काही महत्त्वाच्या टप्प्यांतून झाला आहे. यात सगळ्या पहिलं कारण म्हणजे म्हाडा प्रकरणाचा ‘फास’. गीते यांच्यावर असलेल्या जुन्या म्हाडा प्रकरणाच्या फाईल्स पुन्हा उघडल्या जाण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोरात होती. निवडणुकीच्या रिंगणात राहिल्यास या प्रकरणात अधिक खोलवर चौकशी होऊन कायदेशीर अडथळे निर्माण होऊ शकतात, असा स्पष्ट इशारा गीते यांना मिळाल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय माघार घेण्यापूर्वी गोकुळ गीते यांना मुंबईत ‘वर्षा’ निवासस्थानी बोलावण्यात आले होते. तिथे त्यांची महायुतीच्या बड्या नेत्यांशी चर्चा झाली. या बैठकीत त्यांना राजकीय भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी निवडणूक न लढवण्याचा ‘सल्ला’ देण्यात आल्याचे समजते.
सत्तेच्या दबावापुढे राजकारण झुकले
गीते केवळ बंडखोर नव्हते, तर ते नाराज होते. ही नाराजी दूर करण्यासाठी त्यांना आगामी काळात राजकीय पुनर्वसनाचे आश्वासन देण्यात आले आहे की, न मानल्यास कडक कारवाईचा इशारा देण्यात आला होता? यावर चर्चा सुरू असली तरी, ‘सत्तेच्या दबावापुढे राजकारण झुकले’ हेच वास्तव यामुळे पुन्हा समोर आल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. सध्याच्या अस्थिर राजकीय वातावरणात अधिक आक्रमक होऊन स्वतःचे नुकसान करून घेण्यापेक्षा, माघार घेऊन राजकीय सुरक्षितता निवडणे त्यांनी अधिक सोयीचे मानले असावे. गोकुळ गीते यांनी घेतलेला निर्णय हा ‘आदर्शवादा’पेक्षा ‘व्यवहारवादा’वर आधारित आहे. समोर असलेल्या कायदेशीर चौकशीच्या धोक्यापेक्षा निवडणुकीतील पराभव किंवा अपमान टाळणे त्यांना अधिक सोयीचे वाटले.
गीतेंची माघार दराडेंसाठी संजीवनी
एकूण काय तर, गीते यांच्या माघारीमुळे प्रतिष्ठेची बनलेल्या जागेवर शिवसेना आणि विशेषतः नरेंद्र दराडे यांच्यासाठी ही माघार संजीवनी ठरली आहे. बंडखोरीच्या तडाख्यातून सावरत महायुतीने आपला गड राखण्यात यश मिळवले आहे. गीते यांची माघार म्हणजे केवळ एक अर्ज मागे घेणे नाही, तर ती नाशिकच्या राजकारणातील ‘बदलेल्या समीकरणांची’ कबुली आहे. त्यांनी तलवार म्यान केली असली तरी, या माघारीमुळे त्यांच्या आक्रमक प्रतिमेला धक्का बसला आहे. आता प्रश्न असा उरतो की, गीते यांनी केलेली ही ‘तडजोड’ त्यांना आगामी काळात राजकीय लाभ मिळवून देईल, की त्यांचे राजकीय अस्तित्व हळूहळू पुसून टाकेल? निवडणुकीचे हे ‘ऑपरेशन’ यशस्वी झाले असले, तरी यातून निर्माण झालेली नाराजी आणि अंतर्गत कलह भविष्यात महायुतीला किती महागात पडतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
