Maharashtra Politics : फडणवीस दिल्लीत गेल्यास बावनकुळे की,चंद्रकांतदादा CM कोण?
Devendra Fadnavis फडणवीस केंद्रात गेल्यास बावनकुळे यांच्यासह भाजपमधील अनेक दिग्गज नेत्यांची नावे मुख्यमंत्रीपदाच्या संभाव्य शर्यतीत चर्चेत
Who Becomes CM If Fadnavis Moves To Delhi? : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना उधाण आले आहे. कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मंत्रीपदाची संधी मिळू शकते, असा दावा केला आहे. एवढेच नाही तर, त्यांच्या जागी मुख्यमंत्रीपदासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव पुढे केले आहे. विशेष म्हणजे, फडणवीस केंद्रात गेल्यास बावनकुळे यांच्या नावाची शिफारस स्वतः फडणवीसच करतील, असेही राऊत यांनी म्हटले आहे. या विधानानंतर भाजपमधील अनेक दिग्गज नेत्यांची नावे मुख्यमंत्रीपदाच्या संभाव्य शर्यतीत चर्चेत आली आहेत. नेमकी ही नावं कोणती आणि कोण किती वरचढ याबद्दल जाणून घेऊया…
राऊत नेमकं काय म्हणालेत?
सगळ्यात पहिले तर पत्रकार परिषदेत राऊत नेमकं काय म्हणालेत ते बघूया. तर, संसदेचे पावसाळी अधिवेशन लवकरच सुरू होणार आहे. त्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्यात महाराष्ट्रातील काही नेत्यांच्या नावांचीही चर्चा सुरू असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. राजकीय वर्तुळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात अर्थमंत्री म्हणून संधी मिळू शकते, अशी चर्चा सुरू असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. जर फडणवीस केंद्रात गेले, तर महाराष्ट्राची सूत्रे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हाती दिली जाऊ शकतात. एवढेच नव्हे, तर बावनकुळे यांच्या नावाची शिफारस स्वतः देवेंद्र फडणवीसच करतील, हे माझे राजकीय आकलन असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नसल्याचा दावाही राऊत यांनी केला आहे.
आता राऊत यांच्या विधानानंतर CM पदाच्या शर्यतीत कुणा कुणाची नावं आहेत ते बघूया…
तर, या शर्यतीत सर्वात पहिलं नाव आहे ते फडणवीसांचे विश्वासू, संघटनेवर मजबूत पकड असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांचे. सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. विदर्भातील प्रभावी नेतृत्व, पक्ष संघटनेवरील मजबूत पकड आणि केंद्रीय नेतृत्वाशी असलेले चांगले संबंध ही त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू आहे.
विधानसभा निवडणुकीत पक्ष संघटना उभारण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सरकार आणि संघटना यांच्यात समन्वय साधण्याची क्षमता असल्याने त्यांना ‘नैसर्गिक उत्तराधिकारी’ म्हणून पाहिले जात आहे. जर फडणवीस केंद्रात गेले, तर महाराष्ट्राची सूत्रे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हाती दिली जाऊ शकतात. एवढेच नव्हे, तर बावनकुळे यांच्या नावाची शिफारस स्वतः देवेंद्र फडणवीसच करतील अशीही चर्चा आहे.
राष्ट्रीय पातळीवरील वजनदार तावडेही चर्चेत
बावनकुळे यांच्याशिवाय राज्याची धुरा ज्यांच्या खांद्यावर दिली जाऊ शकते ते नाव म्हणजे राष्ट्रीय नेतृत्वातील वजनदार चेहरा असलेले विनोद तावडे यांचे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून विनोद तावडे सध्या राष्ट्रीय राजकारणात सक्रिय आहेत. संघ परिवाराशी असलेले निकटचे संबंध, संघटन कौशल्य आणि राज्य तसेच केंद्रातील अनुभव यामुळे त्यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहे. पडद्यामागे संघटन उभारण्यात त्यांची विशेष ओळख आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींचा विश्वास संपादन करणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांची गणना होते.
पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून ओबीसी नेत्या चर्चेत
तावडे आणि बानकुळे यांच्यानंतर जे नाव आहे त्या नावाकडे सर्वांच्या विशेष लक्ष आहे. कारण जर, या व्यक्तीकडे राज्याची धूरा दिली गेली तर, त्याची नोंद इतिहासात नोंदवली जाईल. हे नाव कुणा पुरूष नेत्याचे नसून ओबीसी नेतृत्वाचा प्रभावी चेहरा असलेल्या पंकजा मुंडे यांचे आहे. पंकजा मुंडे राज्याच्या मुख्यमंत्री झाल्यास राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळेल. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारशामुळे पंकजा मुंडे यांना राज्यभर मोठी ओळख आहे. मराठवाड्यातील प्रभाव, ओबीसी समाजातील जनाधार आणि महिला नेतृत्वाचा सक्षम पर्याय म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. सामाजिक आणि प्रादेशिक समतोल साधण्याची वेळ आल्यास भाजप त्यांचा गंभीरपणे विचार करू शकतो, असे राजकीय जाणकार मानतात.
पंकजा यांच्यानंतर सर्वाधिक चर्चा आहे ती प्रशासनाचा मोठा अनुभव असलेल्या एता वजनदार नेत्याच्या नावाची आणि ते नाव म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांचे. राज्यातील सर्वाधिक अनुभवी नेत्यांपैकी एक असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे प्रशासनाचा मोठा अनुभव आहे. महसूलसारखे महत्त्वाचे खाते सांभाळताना त्यांनी प्रशासनावर चांगली पकड निर्माण केली आहे. उत्तर महाराष्ट्रातील प्रभाव, शांत स्वभाव आणि सर्व पक्षांशी संवाद ठेवण्याची क्षमता यामुळे ते मुख्यमंत्रीपदासाठी स्वीकारार्ह चेहरा ठरू शकतात.
महाराष्ट्राचे संकटमोचकही स्पर्धेत पण…
वरील दिग्गज नेत्यांच्या रांगेत उत्तर महाराष्ट्रातील नेते आणि महायुती सरकारमध्ये संकटमोचक म्हणून ओळख असलेले गिरीश महाजन यांच्यादेखील नावाची चर्चा आहे. निवडणूक रणनीतीत तरबेज आणि उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे प्रभावी नेते म्हणून गिरीश महाजन यांची ओळख आहे. निवडणूक व्यवस्थापन, संघटन आणि राजकीय रणनीती आखण्यात त्यांना विशेष प्राविण्य मानले जाते. अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र, संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका करत “त्यांचा रेकॉर्ड अत्यंत खराब आहे,” असे म्हटले आहे. तरीही भाजपमधील त्यांचे राजकीय वजन लक्षात घेता त्यांचे नाव चर्चेत आहे.
तावडे, बावनकुळे, महाजन, विखे-पाटील आणि पंकजा यांच्याशिवाय संघटन आणि प्रशासनाचा दुहेरी अनुभव असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्ष विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सध्या मंत्री म्हणूनही ते सक्रिय आहेत. संघाशी असलेले निकटचे संबंध, पश्चिम महाराष्ट्रातील प्रभाव आणि प्रशासनाचा दीर्घ अनुभव यामुळे ते मुख्यमंत्रीपदासाठी संभाव्य दावेदार मानले जात आहेत. संकटाच्या काळात संघटना सांभाळण्याची त्यांची क्षमता हेही त्यांचे मोठे बलस्थान आहे.
अंतिम निर्णय मात्र पक्षश्रेष्ठींचाच
सध्या मुख्यमंत्रीपदाबाबत सुरू असलेल्या सर्व चर्चा या केवळ राजकीय दावे, तर्क-वितर्क आणि शक्यतांवर आधारित आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या केंद्रातील संभाव्य भूमिकेबाबत किंवा महाराष्ट्रात नेतृत्वबदलाबाबत भाजपकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा अंतिम निर्णय भाजपचे केंद्रीय नेतृत्व, संसदीय मंडळ आणि पक्षश्रेष्ठीच घेणार आहेत. त्यामुळे संजय राऊत यांच्या विधानामुळे चर्चांना उधाण आले असले, तरी प्रत्यक्ष निर्णय होईपर्यंत ही केवळ राजकीय शक्यतांचीच चर्चा मानली जात आहे.