मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीचा निकाल भाजपच्या बाजूने लागला तर देशात पुन्हा निवडणुका होतील की नाही याची चिंता आहे, देशात हुकुमशाही येण्याची भीती आहे. पण तशी परिस्थिती येऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुढाकार घेत आहे. उद्या आम्ही पाटण्यात यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र जमत आहोत, असं म्हणतं शरद पवार यांनी विरोधकांच्या आगामी राजकीय वाटचालीविषयी भाष्य केले. ते मुंबईतील षणमुखानंद सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिन मेळावा कार्यक्रमात बोलत होते. (NCP Chief Sharad Pawar criticized Modi government on 2024 Lok Sabha election)
शरद पवार म्हणाले, आज शेतकरी अस्वस्थ आहे, दुखावलेला आहे. मी अलिकडे विदर्भात, खान्देशात, मराठवाड्यात गेलो. तिथं लक्षात आलं की कापूस शेतकऱ्यांनी घरात ठेवला आहे. पूर्वी अशी परिस्थिती नव्हती. मोदींनी सांगितलं होतं की तीन वर्षात शेतकऱ्यांचं उत्पादन डबल करु. पण आज 9 ते 10 वर्ष होऊन गेली. एक गोष्ट डबल झाली ती म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांची आत्महत्या. राज्यात मागच्या पाच महिन्यात 391 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.
राज्यकर्त्यांची जबाबदारी असते की, कायदा आणि सुवव्यस्था राखणे. मात्र आज जाणीवपूर्वक एकमेकांमध्ये, समाजासमाजामध्ये कटूता कशी निर्माण होईल याची खबरदारी घेतली जाते. राज्यात जाती धर्मात तेढ निर्माण केला जात आहे. ज्यात अनेक ठिकाणी दंगलीच्या घटना घडत आहेत. गेल्या काही महिन्यात कोल्हापूर, संगमनेर, नांदेड, अकोला, अमळनेर अशा शहरात जातीय दंगली झाल्या.
महाराष्ट्र हे शांतताप्रिय राज्य म्हणून ओळखले जात होतं. पण आता अनेक हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. याचा अर्थ असा आहे की सत्ताधारी पक्षाची ताकद जिथं नाही तिथं जातीय तेढ निर्माण करणं आणि त्याचा लाभ निवडणुकीमध्ये घेतला जातो. कायदा आणि सुवव्यस्था योग्य नसेल तर त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागते. प्रत्येक लहानातल्या लहान घटकांची, महिलांच्या सुरक्षिततेची काळजी राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. पण आता राज्यातील कायदा सुव्यवस्थेविषयी चिंताजनक आहे. मी माहिती घेतली की, 23 जानेवारी पासून 23 मे पर्यंत राज्यातील 3 हजार 152 महिला बेपत्ता आहेत. म्हणजे त्या कुठे आहेत, राज्यात आहेत की नाहीत हे माहित नाही. ही चांगली बाब नाही.
शरद पवार म्हणाले की, मणिपूर जळत असताना पंतप्रधान अमेरिकेत गेले आहेत. त्यांना कुठे जायचे असेल तिथे त्यांनी जावे, मात्र अंतर्गत स्थितीचा बंदोबस्त केला जावा. देशातील प्रश्नांना त्यांनी प्राधान्य दिले पाहिजे.
यावेळी पवार यांनी संसदेच्या उद्घटनावरुन पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली. राष्ट्रपतींना संसदेच्या उद्घाटनासाठी निमंत्रण का दिले नाही? असा प्रश्न उपस्थित करत पवरा म्हणाले, संसदेच्या पाटीवर फक्त माझं नाव असलं पाहिजे. या इर्शेपोटी मोदी यांनी राष्ट्रपतींना निमंत्रण दिलेले नाही.
राष्ट्रपती तिथे उपस्थित असत्या तर राजशिष्टाचाराप्रमाणे द्रौपदी मुर्मू यांच्याच हस्ते उद्घाटन करावे लागले असते. मग मोदींचे नाव प्रथम आले नसते. त्यामुळे राष्ट्रपतींनी बोलावले गेले नाही. पण राष्ट्रपती असतील, सरन्यायाधीश असतील त्यांच्या पदाचा सन्मान राखला गेला पाहिजे, असे पवार म्हणाले.
एकूण परिस्थिती पाहता आगामी निवडणुकीचा निकाल जर ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांच्याच हातात पुन्हा सत्ता गेली तर या निवडणुका पुन्हा होतील की नाही, याची चिंता आहे. म्हणूनच देशातील मोदी सरकारविरोधात आम्ही विरोधी पक्षांची एकजूट करत आहोत. देशातील लोकशाहीवर विश्वास असलेल्या पक्षांना एकत्रित आणण्यासाठी पाटण्यात जमत आहोत. देशातील लोकशाही, संविधानावर हल्ला करणाऱ्या प्रवृत्तींच्या हातात परत सत्ता जाऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे, असे यावेळी बोलताना पवार म्हणाले.