Sharad Pawar On PM Modi : शरद पवार यांनी २९ जून रोजी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढविला होता. यानंतर कोणी-कोणाची विकेट घेतली याची सर्वत्र चर्चा रंगली होती. पण या पत्रकार परिषदेमधील पवारांनी सांगितलेली एक घटना अनेकांच्या लक्षात आली नाही. आज आम्ही तुम्हाला त्या घटनेची माहिती देणार आहोत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिपब्लीक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक धक्कादायक खुलासे केले होते. त्यामुळे पवार फडणवीसांवर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण पत्रकार परिषद संपताना पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आठवण सांगितली. यावेळी पवारांना मोदींनी सुप्रिया सुळेंचे नाव घेत वैयक्तिक टीका केली असे वाटते का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा पवारांनी यात वैयक्तिक काहीच नाही, असे उत्तर दिले होते. तसेच यावेळी त्यांनी एक घटना सांगितली.
पवार म्हणाले, काही दिवसांपूर्वी माझ्याकडे पुण्यातील काँग्रेसचे नेते रोहित टिळक आले होते. त्यांच्या संस्थेला १ ऑगस्ट या लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीच्या दिवशी मोदींना सन्मानित करायचे होते. पण त्यांचा मोदींकडे संपर्क होत नव्हता. तेव्हा ते माझ्याकडे आले. त्यानंतर मी मोदींशी संपर्क केला व त्यांच्या कार्यालयाकडून १ ऑगस्ट या तारखेसाठी होकार आल्याचे पवारांनी सांगितले.
तसेच कालच्या टीकेनंतर त्यांच्या विचार बदलला असेल तर माहित नाही, असा खास पुणेरी टोमणादेखील पवारांनी लगावला. पण आत्ताच्या माहितीनुसार मोदी हे पुण्याला येणार असल्याचे पवारांनी सांगितले. त्यामुळे पवारांनी प्रयत्न केल्यानंतर मोदी पुण्याला येणार असल्याने एकच चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मोदींच्या विरोधात पाटणा येथे सर्व विरोधक एकत्र आले होते. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे हे नेते उपस्थित होते. यानंतर काही दिवसातच मोदी यांनी भोपाळच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला होता. मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसवर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप असल्याची आठवण करुन दिली होती.
यापूर्वी पंतप्रधान मोदी २०१५ साली बारामती येथे आले असताना मी पवारांचे बोट धरुन राजकारणात आल्याचे वक्तव्य केले होते. पण सध्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. २०१९ साली झालेल्या पहाटेच्या शपथविधीनंतर मोदी आणि पवार यांच्यात वितुष्ट आले असल्याचे बोलले जाते. त्यातच विरोधकांची पाटणा येथे बैठक झाल्यानंतर मोदींनी भोपाळच्या कार्यक्रमात सर्व विरोधकांना पट्ट्यात घेतले. अशातच मोदी पवारांच्या विनंतीवरुन पुण्यात आल्यास खमंग राजकीय चर्चा होणार यात दुमत नाही.