Download App

अखेर अजित पवारांचा शरद पवारांना चकवा; दादांसह 40 आमदार ‘देवेंद्र’वासी

मुंबई : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला असून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीत बंडाचे निशाण फडकावले आहे. तब्बल 40 आमदारांना घेऊन अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला असून आज (2 जुलै) त्यांचा तातडीने शपथविधी होत आहे. अजित पवार यांच्यासह 9 आमदार मंत्रिपदाचे शपथ घेणार आहेत. यात छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अनिल पाटील, संजय बनसोडे, आदिती तटकरे, बाबुराव आत्राम मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

संघटनेत पद देण्याची मागणी केल्यानंतर आज (2 जुलै) देवगिरी बंगल्यावर अजित पवार यांच्या नेतृत्वात समर्थक आमदार आणि राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांची बैठक पार पडली. याच बैठकीनंतर या चर्चांना सुरुवात झाली आहे. अजित पवार यांच्या आजच्या बैठकीला आमदार हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, किरण लहामाटे, दौलत दरोडा, अतुल बेनके, आदिती तटकरे, संग्राम जगताप हे उपस्थित होते. या बैठकीनंतर अजित पवार तातडीने राजभवनाकडे रवाना झाले. याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजपचे नेतेही राजभवनावर उपस्थित आहेत.

अजित पवार यांच्या बैठकीला उपस्थित आमदार –

दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लहमाटे, निलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील, अनुल बेणके, सुनिल टिंगरे, अमोल मिटकरी, अदिती तटकरे, शेखर निकम, निलय नाईक, अशोक पवार, अनिल पाटील, सरोज अहिरे हे आमदार अजित पवार यांच्या आजच्या बैठकीला उपस्थित होते. याशिवाय राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि डॉ. अमोल कोल्हे हेही राजभवनात उपस्थित होते.

अजित पवारांच्या भूमिकेवर राऊतांची टीका :

दरम्यान, अजित पवार यांच्या भूमिकेवर शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी टीका केली. महाराष्ट्राचे राजकारणाचे साफ मातेरे करण्याचा विडा काही लोकांनी उचलला आहे. त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. माझे आताच श्री. शरद पवार यांच्याशी बोलणे झाले. ते म्हणाले, मी खंबीर आहे. लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरेंसह पुन्हा सर्व नव्याने उभे राहु, होय, जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही, असं ट्विट राऊतांनी केलं.

Tags

follow us