Download App

मोठी बातमी : राज्यसभेच्या रिंगणातून शरद पवारांची माघार; अजितदादांच्या ‘उमेदवाराचा’ मार्ग मोकळा

पुणे : देशात 15 राज्यांमधील 56 जागांसाठी राज्यसभेची (RajyaSabha Election) निवडणूक जाहीर झाली आहे. लोकसभेपूर्वी (Lok Sabha Election 2024) होणाऱ्या या निवडणुका आगामी राजकारणाच्या दृष्टीने महत्वाच्या मानल्या जात आहेत. महाराष्ट्रातही सहा जागांसाठी निवडणूक घोषित झाली आहे. मात्र, निवडणूक लढवण्यासाठी पुरेसे संख्याबळ आमच्या पक्षाकडे नाही. त्यामुळे ही निवडणूक लढण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. (NCP President Sharad Pawar clarified that we will not try to contest the Rajya Sabha elections.)

शरद पवार म्हणाले, आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या नऊ ते 10 फेब्रुवारीपर्यंत जागावाटपाचा तिढा सुटेल. ही बोलणी अंतिम टप्प्यात असून, चर्चा पूर्ण झाल्यानंतर त्याबाबतची अंतिम घोषणा करण्यात येईल. शिवाय राज्यसभेच्या सहा जागांसाठी 28 फेब्रुवारीला निवडणूक होत आहे. पण आमच्याकडे राज्यसभा जागा लढवण्यासाठी संख्याबळ नाही. त्यामुळे राष्ट्रवादी ही निवडणूक लढणार नाही.

‘रिसॉर्ट’ पॉलिटिक्समुळे वाचलं सोरेन सरकार; जाणून घ्या यापूर्वी कोणतं सरकार पडलं अन् वाचलं

व्हीपमुळे शरद पवारांची सावध खेळी?

राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेचा निकाल येत्या 15 फेब्रुवारीला लागणार आहे. या निकालात जर व्हीपचे अधिकार अजित पवार यांच्या गटाकडे गेले आणि त्यांनी शरद पवार गटासाठीही व्हीप काढला तर त्यांच्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार राहण्याची शक्यता आहे, त्यामुळेच शरद पवार यांनी निवडणूक न लढविण्याची भूमिका घेत सावध खेळी खेळली असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या या भुमिकेमुळे राष्ट्रवादीमध्ये बंड केलेल्या आणि सावतासुभा मांडलेल्या अजित पवार यांना ही निवडणूक सोपी झाली आहे. ते अगदी सहजपणे त्यांच्या पसंतीच्या उमेदवाराला राज्यसभेवर पाठवू शकणार आहेत.

कोणाची मुदत संपत आहे?

महाराष्ट्रातून 2018 साली राज्यसभेवर निवडून गेलेल्या सहा खासदारांची मुदत दोन एप्रिल रोजी संपत आहे. यात नारायण राणे, प्रकाश जावडेकर आणि व्ही मुरलीधरन या भाजपच्या तीन, राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या वंदना चव्हाण, काँग्रेसचे कुमार केतकर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे अनिल देसाई यांचा समावेश आहे.

Ahmednagar News : रोज जेवू घातलं पण पतीच्या अंधत्वाचा फायदा घेत शेजाऱ्याने थेट पत्नीच पळवली

कसे असणार समीकरण?

विधानसभेच्या सध्या दोन जागा रिक्त आहेत. त्यामुळे नियमानुसार एक जागा निवडून येण्यासाठी 41 मतांची गरज आहे. सध्या भाजपचे 104 आमदार आहेत. या संख्याबळानुसार भाजपच्या स्वतःच्या मतांवर दोन जागा सहज निवडून येऊ शकतात. त्यानंतर त्यांच्याकडे 22 मते शिल्लक राहतात. तर सरकारला 22 छोट्या पक्षांच्या आणि अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. या मतांच्या मदतीने तिसरी जागाही निवडून येऊ शकते.

दुसऱ्या बाजूला सध्याच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची जागा शिंदेंच्या शिवसेनेला आणि राष्ट्रवादी (शरद पवार) गटाची जागा अजित पवार यांच्या गटाला जाणार असल्याचे निश्चित आहे. शिंदेंचे सध्या 39 तर अजितदादांचे 41 आमदार आहेत. त्यामुळे या दोन्ही जागांवर दोघांचेही उमेदवार सहज निवडून येऊ शकतात.

follow us