शिराळा : एका बाजूला समरजीत घाटगे, हर्षवर्धन पाटील, विवेक कोल्हे हे नेते भाजप (BJP) सोडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते, माजी मंत्री आणि 32 शिराळ्याचे माजी आमदार शिवाजीराव नाईक (Shivajirao Naik) हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawade) यांनी नुकतीच नाईक यांची भेट घेतली. दोघांची बराच वेळ बंद दाराआड चर्चा झाली असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे शिराळ्यात भाजप शरद पवार यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जाते. (NCP (Sharadchandra Pawar) party leader Shivajirao Naik meet vinod Tawade and now join BJP)
सांगलीत नुकताच भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला विनोद तावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळावा संपल्यानंतर तावडे यांनी शिवाजीराव नाईक यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी या दोन नेत्यांमध्ये बंद दाराआड राजकीय चर्चा झाली. नाईक यापूर्वी भाजपमध्येच होते. 2014 मध्ये ते भाजपकडून आमदारही झाले होते. पण 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मानसिंगराव नाईक यांनी शिवाजीराव नाईक यांचा पराभव केला. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजपचे तत्कालिन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करत शिवाजीराव नाईक राष्ट्रवादीमध्ये आले होते. मात्र आता ते पुन्हा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
सध्या शिराळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे मानसिंगराव नाईक आमदार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत त्यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. तर महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपला सुटणार असल्याचे दिसून येते. भाजपकडून सध्या सम्राट महाडिक यांचे नाव चर्चेत आहे. ते गत पाच वर्षापासून आमदारकीसाठी तयारी करत आहेत. शिवाय माजी आमदार शिवाजीराव नाईक यांचे चिरंजीव सत्यजित देशमुख हेही भाजपकडून उमेदवारी मागत आहेत. अशात आता शिवाजीराव नाईकही भाजपमध्ये आले तर उमेदवारी कोणाला मिळणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
शिवाजीराव नाईक हे 1979 ते 1992 या काळात सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. 1995 मध्ये पहिल्यांदा अपक्ष आमदार झाले. युती सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली. जून 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळी जिल्ह्यात सगळ्यात आधी शिवाजीराव नाईक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. ते 1999 मध्ये राष्ट्रवादीतर्फे तर 2004 मध्ये अपक्ष आमदार झाले. 2009 मध्ये ते काँग्रेसकडून लढले पण त्यांचा पराभव झाला. 2014 मध्ये ते आमदारकीचा ‘चौकार’ मारत भाजपातर्फे विधानसभेत पोहोचले.