NEET Paper Leak Case : नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई करत पुण्यातून आणखी एका आरोपीला अटक केली आहे. मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये गॉड या नावाने सेव्ह असलेल्या व्यक्ती तेजस शहाला अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील एपीएमए कोचिंग संस्थेतील भौतिकशास्त्र शिक्षक तेजस हर्षदकुमार शाह (Tejas Shah) याला पोलिसांनी नीट पेपर फुटी प्रकरणात अटक केली आहे. तेजसने भौतिकशास्त्राचे लीक प्रश्न मिळवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणातून सीबीआयने आतापर्यंत बारा ते तेरा जणांना अटक केली आहे.
पुण्यातून अटक करण्यात आलेली मनीषा हवालदार (Manisha Havaldar) हिच्या पतीच्या मोबाईलमध्ये गॉड या नावाने सेव्ह असलेल्या नंबरसोबत काही संशयास्पद चॅट्स सीबीआयला (CBI) सापडली होती. सीबीआयने सेलेब्राइट प्रीमियम या फॉरेन्सिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मोबाईल तपासाणी करत आता या प्रकरणात तेजस शाहला अटक केली आहे.
सीबीआयने या प्रकरणात शुक्रवार 22 मे रोजी पुण्यातून फिजिक्स शिक्षक मनीषा हवालदार हिला पुण्यातून अटक केली आहे. प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वी काही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले असल्याचा आरोप मनीषा हवालदारवर सीबीआयकडून करण्यात आला आहे. या प्रकरणात सीबीआयने मनीषा हवालदार हिच्या निवासस्थानी तपास केला असता सीबीआयला मोबाइल,लॅपटॉप, हार्ड डिस्क, नीट प्रश्नपत्रिकांच्या प्रती, हस्तलिखित नोंदी तसेच विद्यार्थ्यांशी संबंधित कागदपत्रे जप्त केली आहेत. याचबरोबर घरातून सीबीआयला 1 लाख 1 हजार 930 रुपयांची रोकडही हस्तगत करण्यात आली आहे.
सीबीआयने या प्रकरणातून पुण्यातून आतापर्यंत मनीषा हवालदार, मनीषा मांढरे , मनीषा वाघमारे आणि तेजस शाहला अटक केली आहे. तर आता या प्रकरणात आणखी काय खुलासे होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.
