NEET Paper Leak : नीट पेपर लीक अन् तीन ‘मनीषा’; एकाच नावाच्या गँगची इनसाईड स्टोरी
NEET Paper Leak NEET घोटाळ्यात पुण्यातून अटक झालेल्या तिन्ही महिला 'मनीषा'च! 'ते' चक्रावून टाकणारं कनेक्शन
देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘नीट-यूजी 2026’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातून आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली आहे. पण, यापैकी अटक करण्यात आलेल्या तीन महिला प्राध्यापकांची नावे एक सारखीच म्हणजचे मनिषा अशीच आहेत. सीबीआयच्या तपासात या ‘मनीषा कनेक्शन’चे डार्क गुपित उघड झाले असून, या तिघींचे एकमेकींशी असलेले अंतर्गत धागेदोरे पाहून अधिकारीही थक्क झाले आहेत. या ‘मनीषा कनेक्शन’चे धागेदोरे एकमेकींशी कसे जोडलेले होते आणि त्यांनी कसा कट रचला, याचे धक्कादायक वास्तव आता समोर आले आहे.
‘थ्री-लेअर’ क्राईम पॅटर्न, कशा अडकल्या तीन ‘मनीषा’?
नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयने आतापर्यंत पुणे परिसरातून एकूण 5 जणांना गजाआड केले आहे. यातील 3 महिला आरोपींची नावं ‘मनीषा’ असून, या तिन्ही महिलांनी अत्यंत पद्धतशीरपणे एकमेकांच्या संपर्कात राहून हे रॅकेट चालवल्याचे उघड झाले आहे. यातील पहिली मनीषा वाघमारे पेशाने ब्युटीपार्लर चालक. पैशांच्या हव्यासापोटी या रॅकेटमध्ये विद्यार्थी आणि श्रीमंत पालक शोधण्याची जबाबदारी हिच्याकडे होती. हिच्या चौकशीतून रसायनशास्त्र तज्ज्ञ प्रा. पी. व्ही. कुलकर्णी यांचे नाव समोर आले. त्यानंतर दुसरी मनिषा म्हणजे प्रा. मनीषा मांढरेला अटक करण्यात आली. मांढरे पुण्यातील नामांकित मॉडर्न कॉलेजच्या बायोलॉजी शिक्षिका. प्रा. कुलकर्णीच्या माध्यमातून सीबीआय मांढेरेपर्यंत पोहोचली. प्रश्नपत्रिका पुढे पास करणे आणि वाघमारेने आणलेल्या ग्राहकांचे डील पूर्ण करण्याची जाबाबदारी मांढरेंकडे होती असे सांगितले जाते.
यानंतर तिसरी आणि मुख्य कडी सीबीआयच्या जाळ्यात अडकली ती म्हणजे मनीषा संजय हवालदार. प्रा. मनीषा मांढरे हिच्या चौकशीतून या तिसऱ्या मनीषाचा माग लागला. हवालदार सदाशिव पेठेत राहणाऱ्या आणि ‘शेठ हिरालाल सराफ प्रशाले’च्या मुख्याध्यापिका आहे. या प्रकरणातील तिसरी आरोपी मनीषा हवालदार हिच्याबाबत अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (NTA) तिची ‘नीट’ परीक्षेसाठी ‘भौतिकशास्त्र’ विषयाची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली होती. प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या अतिगोपनीय प्रक्रियेत सामील असल्याने मुख्य प्रश्न थेट तिच्याकडेच उपलब्ध होते.
पार्लर ते सिक्रेट मीटिंग्ज; असा रचला गेला कट
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या रॅकेटची सुरुवात ब्युटीपार्लरमधून झाली. मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे यांची ओळख पार्लरमध्ये झाली होती. वाघमारेने पालक आणि विद्यार्थ्यांना जाळ्यात ओढून थेट मनीषा मांढरेकडे पाठवण्यास सुरुवात केली. पुढे, प्रा. मनीषा मांढरे आणि मुख्याध्यापिका मनीषा हवालदार यांच्यात केवळ मैत्री नव्हती, तर त्या या काळ्या धंद्यात ‘पार्टनर्स’ असल्याचे सांगितले जात आहे. या दोन्ही मनीषा अत्यंत गुप्त ठिकाणी भेटायच्या आणि याच भेटींमध्ये लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य विकण्याचा सौदा ठरवला जायचा असे समोर येत आहे. हवालदार पदाचा गैरवापर करत एप्रिल 2026 मध्ये हे भौतिकशास्त्राचे प्रश्न दुसरी आरोपी प्रा. मनीषा मांढरे हिच्यासोबत शेअर केले. सीबीआय तपासात निष्पन्न झाले आहे की, या दोघींनी लीक केलेले प्रश्न आणि प्रत्यक्ष ‘नीट’च्या परीक्षेत आलेले प्रश्न तंतोतंत सारखे होते.
पहिली आणि दुसरीच्या चौकशीतून तिसरी थेट जाळ्यात
शिवराज मोटेगावकर, पी. व्ही. कुलकर्णी आणि पहिल्या दोन मनीषा यांच्या सीबीआय कोठडीतील मॅरेथॉन चौकशीत मुख्याध्यापिका मनीषा हवालदारचे नाव कन्फर्म झाले. यानंतर शुक्रवारी सकाळी सीबीआयने सदाशिव पेठेतील ‘शेठ हिरालाल सराफ प्रशालेत’ थेट हाय-व्होल्टेज छापेमारी केली आणि या तिसऱ्या मनीषाला रंगेहाथ उचलले.
निवृत्तीच्या महिनाभर आधीच बेड्या
विशेष म्हणजे, अवघ्या महिनाभरात मनीषा हवालदार या शासकीय सेवेतून सन्मानाने निवृत्त होणार होत्या. मात्र, निवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाच त्यांच्या पापाचा घडा फुटला. आता सन्मान आणि निवृत्ती वेतनाऐवजी त्यांना थेट तुरुंगाची हवा खावी लागत आहे. पुण्याच्या या ‘मनीषा त्रिकुटा’मागे आणखी कोणती मोठी डोकी आहेत, याचा कसून तपास आता सीबीआय करत आहे.