राहुल गांधींच्या ‘छात्रों की गुंज’आधी पुण्यात तुफान राडा; रात्री उशिरा ABVP अन् NSUI आमने-सामने

कार्यक्रम उधळून लावण्यासाठी हे षडयंत्र रचले जात असल्याचेही त्यांनी म्हटले. या आरोपांमुळे वादाला आणखी राजकीय रंग चढला आहे.

Pune Congress

पुण्यात काँग्रेस नेते राहुल गांधी (Pune) यांच्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयूआय आणि भाजपाशी संबंधित अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात वाद निर्माण झाला आहे. सीओईपी परिसरात दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असून, एनएसयूआयने अभाविपच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण आणि धमकावल्याचा आरोप केला आहे. या प्रकारामुळे राहुल गांधी यांच्या दौऱ्याच्या एक दिवस आधीच पुण्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमात ते युवक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. मात्र, कार्यक्रमाआधीच सीओईपी परिसरात काही अभाविप कार्यकर्ते आल्याचा आणि त्यांनी विद्यार्थ्यांवर कार्यक्रमाला उपस्थित न राहण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप एनएसयूआयकडून करण्यात आला आहे. या घटनेनंतर काँग्रेस समर्थक विद्यार्थी मोठ्या संख्येने परिसरात जमा झाले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाल्याने काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं.

राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पॅलेट गन प्रकरणात अखेर FIR, दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप

या वादाची माहिती मिळताच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अभाविपवर गंभीर आरोप करत सीओईपीमधील दोन अनाथ विद्यार्थिनींवर दबाव आणण्यात आल्याचा दावा केला. राहुल गांधी यांच्या कार्यक्रमात या विद्यार्थिनींनी सहभागी होऊ नये, यासाठी त्यांना कोंडून ठेवण्यात आले आणि मारहाण करण्यात आल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. कार्यक्रम उधळून लावण्यासाठी हे षडयंत्र रचले जात असल्याचेही त्यांनी म्हटले. या आरोपांमुळे वादाला आणखी राजकीय रंग चढला आहे.

दरम्यान, शुल्कासंदर्भात तक्रार करणाऱ्या सीओईपीमधील एका विद्यार्थिनीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये फीबाबतचे आरोप चुकीचे असून ते आपल्याकडून वदवून घेतल्याचे सांगत संबंधित विद्यार्थिनी कॉलेज प्रशासनाची माफी मागताना दिसत आहे. या व्हिडीओचा आधार घेत अभाविपने काँग्रेसवर विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शुल्काचा मुद्दा राजकीय पद्धतीने मांडल्याचा आरोप केला आहे.

सीओईपीसारख्या तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाच्या संस्थेच्या शुल्काबाबत चुकीची माहिती विद्यार्थ्यांकडून वदवून घेत काँग्रेस राजकारण करत असल्याचा आरोप अभाविपने केला. राहुल गांधी यांना विद्यार्थ्यांचे प्रश्न खरोखर ऐकायचे असतील, तर अशा प्रकारच्या राजकारणाऐवजी विद्यार्थ्यांच्या वास्तविक प्रश्नांवर चर्चा करावी, असेही अभाविपने म्हटले आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याआधीच काँग्रेस आणि अभाविपमध्ये सुरू झालेला हा वाद आगामी कार्यक्रमात कोणते स्वरूप घेतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

follow us