विद्यार्थी आंदोलनातील पोलिसी कारवाईवरून राहुल गांधी आक्रमक; संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या

कथित पेलेटगन वापराच्या विरोधात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर धरणे आंदोलन केले.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design (94)

Rahul Gandhi’s protest on Sansad Marg : दिल्लीतील जंतरमंतर येथे 20 जुलै रोजी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कथित पेलेटगन वापराच्या विरोधात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनीही सहभाग घेत राहुल गांधींना पाठिंबा दिला. राहुल गांधी यांनी यापूर्वी मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात जाऊन विद्यार्थी आंदोलनातील कथित पोलिसी कारवाईबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

त्यानंतर राहुल गांधी यांनी कनॉट प्लेस येथील डीसीपी कार्यालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि विद्यार्थी आंदोलकांवर करण्यात आलेल्या कथित अत्याधिक बळाच्या वापराबाबत औपचारिक तक्रार नोंदवण्याची मागणी केली. राहुल गांधी यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत या प्रकरणात अधिकृतपणे तक्रार नोंदवली जात नाही आणि न्याय मिळत नाही, तोपर्यंत ते आपला लढा सुरू ठेवतील. यापूर्वी 25 जुलै रोजी पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर थेट निशाणा साधला होता.

विद्यार्थी आंदोलनादरम्यान पेलेटगनसह अत्याधिक बळाचा वापर करण्यास अमित शाह जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला होता. हा मुद्दा संसदेत उपस्थित करण्यासारखा अत्यंत गंभीर असल्याचेही त्यांनी म्हटले होते. काँग्रेसने जारी केलेल्या निवेदनात दावा केला आहे की, विद्यार्थी आंदोलक साहिल लोचाव याच्यावर झालेल्या कथित पेलेटगन हल्ल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अद्याप एफआयआर नोंदवलेला नाही. पक्षाच्या म्हणण्यानुसार, साहिल लोचाव यांनी 14 ऑगस्ट रोजी आपल्या वकिलांच्या उपस्थितीत लेखी तक्रार दाखल केली होती. मात्र त्यांना तपास अधिकाऱ्याचा क्रमांक किंवा तक्रारीची कोणतीही अधिकृत पावती देण्यात आली नाही. त्यानंतर 17 ऑगस्ट रोजी ई-मेल आणि दूरध्वनीद्वारेही पाठपुरावा करण्यात आला, तरीही कोणतीही कारवाई झालेली नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

AI वापरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी OpenAI चं मोठं पाऊल, लॉन्च केलं ‘ChatGPT for Teens’

यानंतर राहुल गांधी स्वतः साहिल लोचाव यांच्यासोबत डीसीपी कार्यालयात गेले आणि गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. मात्र संबंधित तपास अधिकाऱ्याचे नाव किंवा तपास क्रमांक देण्यात आला नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. हा दखलपात्र गुन्हा असल्याने एफआयआर नोंदवणे कायदेशीरदृष्ट्या आवश्यक असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. एफआयआर नाही, म्हणजे न्याय नाही. त्यामुळे आम्ही येथे बसलो आहोत, असे काँग्रेसने म्हटले आहे. हा केवळ विलंब नसून न्याय नाकारण्याचा प्रकार आहे. एफआयआर दाखल होईपर्यंत आम्ही येथून हलणार नाही, असा इशाराही पक्षाने दिला.

दरम्यान, 20 जुलै रोजी ‘सीजेपी’ या संघटनेच्या नेतृत्वाखाली हजारो विद्यार्थ्यांनी संसद मार्च काढला होता. कथित प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांवरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आणि परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी आंदोलकांनी केली होती. आंदोलकांनी संसदेकडे मोर्चा वळवण्याचा आणि पोलिसांचे बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी अश्रुधूराचा वापर आणि लाठीमार केल्याचे वृत्त आहे. या घटनेचे अनेक व्हिडिओ नंतर समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. त्यामध्ये पोलिसांकडून आंदोलकांशी धक्काबुक्की आणि कथित गैरवर्तन होत असल्याचे दिसून आल्याने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.

मात्र दिल्ली पोलिसांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आंदोलकांच्या काही गटांनी हिंसक वर्तन करत दगडफेक केल्यानंतरच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक तेवढ्याच प्रमाणात बळाचा वापर करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्यामुळे विद्यार्थी आंदोलनातील पोलिसी कारवाई आणि पेलेटगन वापराचा मुद्दा आता राजकीय आणि कायदेशीर वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.

follow us