NEET scam raises question mark over original coaching industry : देशभरात गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात आता एक धक्कादायक आणि शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी माहिती समोर आली आहे. नीट आणि जेईई पाईक्षेची तयारी करून देणाऱ्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अटक केली असून न्यायालयाने त्यांना 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. पण या प्रकरणात फक्त पेपरफुटीचं नाही, तर कोचिंग क्लासेसमधील व्हीआयपी शिक्षण पद्धतीचा देखील मुद्दा आता चर्चेत आला आहे.
राज्यातील आठ मोठ्या शहरांमध्ये आरसीसीच्या शाखा आहेत. हजारो विद्यार्थी दरवर्षी डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्याचं स्वप्न घेऊन क्लासेसमध्ये प्रवेश घेतात. साधारणपणे 25 ते 30 हजार विद्यार्थी आरसीसी मध्ये नीट आणि जेईई ची तयारी करत होते. मात्र, या हजारोंच्या गर्दीत फक्त 150 विद्यार्थ्यांसाठी वेगळी आणि विशेष व्यवस्था होती. या बॅचचं नाव होतं, फोटॉन बॅच.
ही फोटॉन बॅच म्हणजे आरसीसी ची सर्वात प्रतिष्ठेची आणि विशेष बॅच मनाली जायची. आरसीसीकडून एक सामायिक परीक्षा घेतली जायची आणि त्यातून निवडलेल्या टॉप 150 विद्यार्थ्यांनाच या बॅचमध्ये प्रवेश मिळायचा. बाकीचे हजारो विद्यार्थी सामान्य बॅचमध्ये शिकत राहायचे. विशेष म्हणजे फी सर्वांकडून जवळपास समान घेतली जायची, पण सुविधा मात्र समान नव्हत्या.
फोटॉन बॅचसाठी आरसीसीचे सर्वात अनुभवी आणि प्रभावी शिक्षक नियुक्त केले जायचे. विद्यार्थ्यांचे डाउट्स सोडवण्यासाठी शिक्षक पूर्णवेळ उपलब्ध असायचे. काही विद्यार्थ्यांच्या दाव्यानुसार, कोणतीही अडचण आल्यास थेट शिवराज मोटेगावकर यांच्याशी संपर्क साधण्याची मुभा देखील या विद्यार्थ्यांना होती. या बॅचमध्ये फक्त १५० विद्यार्थी असायचे, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिलं जायचं.
डावखरे कुटुंबात फूट, निरंजन डावखरेंच्या मोठ्या भावाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश…
दुसरीकडे, सामान्य बॅचमध्ये मात्र 300 पेक्षा जास्त विद्यार्थी एका वर्गात बसत होते. त्यामुळे शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याकडे कितपत लक्ष देऊ शकत होते, हा प्रश्न अनेक पालक उपस्थित करत होते. मात्र त्यावेळी या व्यवस्थेबद्दल फारशी चर्चा झाली नाही. कारण निकालांमध्ये आरसीसीचे यश मोठ्या प्रमाणावर झळकत होते. एका विद्यार्थ्यांच्या माहितीनुसार, फोटॉन बॅचमधील जवळपास 60 टक्के विद्यार्थी एमबीबीएस साठी पात्र ठरत होते. तर सामान्य बॅचमध्ये हे प्रमाण फक्त 15 ते 20 टक्क्यांपर्यंत मर्यादित होतं. निकाल जाहीर झाल्यानंतर आरसीसीच्या जाहिरातींमध्ये आणि होर्डिंग्जवर सर्वाधिक चेहरे हे फोटॉन बॅचमधील विद्यार्थ्यांचेच असायचे. त्यामुळे बाहेरून पाहणाऱ्या पालकांना वाटायचं की आरसीसीमधील प्रत्येक विद्यार्थ्याला अशीच गुणवत्ता आणि सुविधा मिळत असतील. मात्र प्रत्यक्षात आतलं गणित वेगळंच होतं.
आता या सर्व चर्चेला अधिक गंभीर वळण मिळालं आहे, कारण नीट पेपरफुटी प्रकरणात आरसीसीचं नाव थेट समोर आलं आहे. सीबीआयच्या तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. आरसीसीच्या टेस्ट सिरीजमधील तब्बल 101 प्रश्न नीटच्या अंतिम परीक्षेत आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे पेपरफुटी आणि क्लासेसमधील संबंध अधिक गडद झाले आहेत.
या संपूर्ण रॅकेटमध्ये अनेक जण सामील असल्याचं तपासात समोर आलं आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून निवृत्त केमिस्ट्री प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांचं नाव समोर आलं आहे. ते नीटच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनेलमध्ये होते. त्यांच्यासोबत पुण्यातील मॉडर्न कॉलेजच्या बायोलॉजी प्राध्यापिका मनीषा मांढरे यांचा देखील सहभाग असल्याचा आरोप आहे. त्या देखील प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनेलमध्ये कार्यरत होत्या.
राज्यात उन्हाचा पारा पुन्हा वाढला; गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान विभागाचा अंदाज काय?
याशिवाय, नाशिकमधील बीएएमएस विद्यार्थी शुभम खैरनार हा श्रीमंत कुटुंबातील विद्यार्थ्यांवर लक्ष ठेऊन त्यांच्या पालकांशी संपर्क साधत असल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील ब्युटी पार्लर चालक मनीषा वाघमारे आणि अहिल्यानगरमधील आयुर्वेद डॉक्टर धनंजय लोखंडे हे विद्यार्थ्यांना शोधून त्यांना प्रश्नपत्रिका पुरवणाऱ्या सूत्रधारांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असल्याचा संशय आहे.
या प्रकरणामुळे आता देशातील कोचिंग संस्कृती, स्पर्धा परीक्षा आणि शिक्षण व्यवस्थेवर मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत. समान फी भरून देखील काही विद्यार्थ्यांना व्हीआयपी सुविधा मिळतात आणि उरलेले हजारो विद्यार्थी फक्त गर्दीचा भाग बनतात का? गुणवत्तेपेक्षा नेटवर्क आणि पैशाचं महत्व वाढत चाललं आहे का? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, डॉक्टर होण्यासाठीची परीक्षा जर अशा प्रकारे संशयाच्या भोवऱ्यात अडकत असेल, तर देशाच्या भविष्यतील आरोग्य व्यवस्थेचं काय? सध्या सीबीआयकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, आणखी काही मोठी नावं समोर येण्याची शकयता व्यक्त केली जात आहे.
