पुण्यात पती-पत्नी, सख्ख्या भावांसह सासू-सुना देखील महापालिका सभागृहात दिसणार एकत्र

पुणे महापालिका निवडणुकीत एकाच घरातील एकापेक्षा अधिक उमेदवार निवडून येण्याची परंपरा यंदाही कायम राहिली आहे.

Untitled Design (272)

Untitled Design (272)

Pune Municipal Corporation : पुण्यासह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल काल, शुक्रवारी (ता. 16) जाहीर झाले. या निकालांमध्ये राज्याच्या राजकारणाचं चित्र मोठ्या प्रमाणात बदललेलं दिसून आलं. अनेक महानगरपालिकांमध्ये भाजपने मोठ्या प्रमाणात यश मिळवत सत्ता स्थापनेचा दावा मजबूत केला, तर त्याखालोखाल शिंदे गटाच्या शिवसेनेनेही समाधानकारक कामगिरी केली. मात्र, या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेला मोठा धक्का बसल्याचं स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, पुणे महापालिकेच्या निकालांकडे विशेष लक्ष लागलं होतं आणि निकाल जाहीर होताच पुण्याच्या राजकारणातील काही जुनी परंपरा यावेळीही कायम राहिल्याचं चित्र समोर आलं. पुणे महापालिका निवडणुकीत एकाच घरातील एकापेक्षा अधिक उमेदवार निवडून येण्याची परंपरा यंदाही कायम राहिली आहे. यामध्ये पती-पत्नी, दोन सख्खे भाऊ तसेच सासू-सून अशा नात्यांतील उमेदवारांनी एकाचवेळी सभागृहात प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे आगामी काळात पुणे महापालिकेच्या सभागृहात पती-पत्नीसह सासू आणि सूनही एकत्र बसलेले दिसणार आहेत.

पुणे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3, विमाननगर-लोहगाव येथून भाजपच्या उमेदवार ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांनी विजय मिळवला आहे. तर प्रभाग क्रमांक 4, खराडी-वाघोली येथून भाजपचेच उमेदवार सुरेंद्र पठारे विजयी झाले आहेत. या निकालामुळे पठारे दाम्पत्य थेट पुणे महापालिकेच्या सभागृहात दाखल होणार असून, एकाच कुटुंबातील दोन सदस्य एकत्र नगरसेवक म्हणून काम करताना दिसणार आहेत.

याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते दीपक मानकर यांच्या कुटुंबालाही या निवडणुकीत यश मिळालं आहे. प्रभाग क्रमांक 11, रामबाग कॉलनी-शिवतीर्थनगर येथून हर्षवर्धन मानकर हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून विजयी झाले आहेत. तर त्यांचे सख्खे बंधू राघवेंद्र मानकर हे प्रभाग क्रमांक 25, महात्मा फुले मंडई येथून भाजपच्या तिकिटावर विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे, दोन सख्खे भाऊ दोन वेगवेगळ्या पक्षांकडून निवडून येत सभागृहात पोहोचले आहेत.

पुण्यात अजितदादांना मोठा धक्का, भाजपचं वर्चस्व; कुणी कुठे मारली बाजी?

दरम्यान, प्रभाग क्रमांक 23 , रविवार पेठ-नाना पेठ येथील निकालाने मोठी चर्चा निर्माण केली आहे. या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या सोनाली आंदेकर या ‘अ’ प्रवर्गातून, तर लक्ष्मी आंदेकर या ‘ब’ प्रवर्गातून विजयी झाल्या आहेत. या निकालामुळे सासू-सून दोघीही एकाचवेळी पुणे महापालिकेच्या सभागृहात पोहोचल्या आहेत.

मात्र, या प्रकरणाला गुन्हेगारी पार्श्वभूमीचा संदर्भ असल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. नाना पेठेतील आयुष कोमकर खून प्रकरणातील आरोपी आणि सध्या तुरुंगात असलेल्या सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर या सून व सासू असून, त्यांनी निवडणूक लढवली होती. या कुटुंबातील तीन महिला उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून निवडणूक लढवली होती. त्यापैकी सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर या दोघी विजयी झाल्या असून, त्या आता थेट सभागृहात पोहोचल्या आहेत.

दुसरीकडे, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या काही उमेदवारांना मतदारांनी स्पष्ट नकार दिल्याचंही चित्र आहे. प्रभाग क्रमांक 10, बावधन–भुसारी कॉलनी येथून कुख्यात गुंड गजा मारणे यांची पत्नी जयश्री मारणे निवडणूक लढवत होत्या. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच प्रभाग क्रमांक 39 मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून कुख्यात गुंड बापू नायर यांनी निवडणूक लढवली होती, पण त्यांनाही मतदारांनी पराभूत केलं आहे.

एकीकडे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या काही उमेदवारांचा पराभव, तर दुसरीकडे त्याच पार्श्वभूमीतील काही उमेदवारांचा विजय, या विरोधाभासी चित्रामुळे पुणे महापालिकेच्या निकालांवर राजकीय आणि सामाजिक पातळीवर मोठी चर्चा सुरू झाली आहे. आगामी काळात नव्या सभागृहात हे विषय कितपत गाजणार, आणि प्रशासन व कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवर कोणती भूमिका घेतली जाणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.

Exit mobile version