पुण्यातील खराडीत 11 लाख स्क्वेअर फूट जागेची मेगा डील; 1,000 कोटींची ऑफिस स्पेस विक्री
आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात नुकताच तब्बल 11 लाख चौरस फूट प्रीमियम ऑफिस स्पेसचा भव्य व्यवहार पार पडला.
Mega deal for 11 lakh square feet of land in Kharadi, Pune : मुंबईनंतर आता पुण्याच्या रिअल इस्टेट बाजारातही मोठ्या व्यवहारांची लगबग वाढताना दिसत आहे. आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात नुकताच तब्बल 11 लाख चौरस फूट प्रीमियम ऑफिस स्पेसचा भव्य व्यवहार पार पडला आहे. सुमारे 1,000 कोटी रुपयांच्या आसपास झालेल्या या डीलमुळे पुण्याच्या मालमत्ता बाजारात चांगलीच चर्चा रंगली आहे.
ही मालमत्ता पुण्यातील वेगाने विकसित होत असलेल्या खराडी परिसरात आहे. ‘टेनस्टेप्स’ म्हणून ओळखली जाणारी ही ग्रेड-ए+ ऑफिस मालमत्ता एका संयुक्त उपक्रमाच्या माध्यमातून खरेदी करण्यात आली आहे. व्यावसायिक रिअल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी ओळखल्या जाणाऱ्या प्राईम ऑफिसेस फंडने ही खरेदी केली आहे. या व्यवहारात प्राईमचा 51 टक्के हिस्सा असून उर्वरित हिस्सा केपेलकडे आहे.
प्राईमचे व्यवस्थापन नुवामा आणि कश्मन अँड वीकफिल्ड मॅनेजमेंट यांच्या माध्यमातून केले जाते. या अधिग्रहणासह प्राईमने दिल्ली-एनसीआर आणि चेन्नईनंतर पुण्यात तिसऱ्या शहरात प्रवेश केला आहे. या व्यवहारानंतर प्राईमचा एकूण पोर्टफोलिओ सुमारे 3.8 दशलक्ष चौरस फूटांवर पोहोचला आहे. तसेच NCW च्या एकूण सकल मालमत्ता मूल्याने 4,000 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
एकनाथ शिंदेंच्याबाबतीतही तोच प्रकार घडणार होता का? आमदार रोहित पवारांकडून प्रश्नांची सरबत्ती…
या व्यवहाराबाबत बोलताना मुख्य गुंतवणूक अधिकारी गौरव पुरी यांनी सांगितले की, हा व्यवहार आमच्या शिस्तबद्ध भांडवली गुंतवणूक धोरणाशी सुसंगत आहे. प्रमुख वाढीच्या बाजारपेठांमध्ये उच्च-गुणवत्तेच्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्यावर आमचा भर आहे. पुणे ही अशी बाजारपेठ आहे जिथे दीर्घकालीन मागणी आणि मूल्यनिर्मितीची मोठी क्षमता आम्हाला दिसते.
दरम्यान, भारतातील ऑफिस मार्केटमध्ये संस्थात्मक गुंतवणूकदारांचा रस सातत्याने वाढत आहे. आयटी आणि जागतिक क्षमता केंद्रांचे मजबूत केंद्र म्हणून पुण्याची ओळख निर्माण झाली आहे. सुधारित पायाभूत सुविधा, वाढती आयटी गुंतवणूक आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांची उपस्थिती यामुळे पुण्यातील ऑफिस स्पेसची मागणी झपाट्याने वाढत आहे.
जागतिक पातळीवरील आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवरही दीर्घकालीन भांडवल आणि मजबूत प्रायोजक उच्च दर्जाच्या ऑफिस मालमत्तांकडे वळत असल्याचे या व्यवहारातून स्पष्ट होते. त्यामुळे आगामी काळातही पुण्याच्या रिअल इस्टेट बाजारात अशाच मोठ्या डील्स पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
