Download App

रविंद्र चव्हाणांची भाजपच्या प्रदेशाध्यपदी नियुक्ती; माईंड गेम खेळत भाजपच देणार शिंदेंना शह

New Maharashtra BJP President Ravindra Chavan: भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी… सध्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणारे आमदार रविंद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात सामावेश झाल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं. रविंद्र चव्हाण हे डोंबिवलीचे चार वेळा आमदार राहिले असून, त्यांची निवड ही ठाणे जिल्ह्याच्या राजकीय ताकदीचं प्रतिक मानलं जात आहे. भाजपसाठी पारंपरिकदृष्ट्या हे क्षेत्र महत्त्वाचं राहिलं असलं तरी गेल्या काही वर्षांत एकनाथ शिंदे यांच्या प्रभावामुळे इथलं सत्तासमीकरण बदललं होतं. अशा स्थितीत भाजपने स्वतंत्रपणे संघटना बळकट करण्यासाठी ठाण्याच्याच नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. या आधी ही ठाणे जिल्ह्यानं भाजपाला रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे, अशोकराव मोडक यांसारखे नेते दिले आहेत.

रविंद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संबंध हे नेहमीच सहकार्य आणि स्पर्धा यामधील एका नाजूक वळणावरचे राहिले आहेत. चव्हाण आणि शिंदे यांच्यातील नातं अनेकदा ‘Love-Hate Relationship’ अशा स्वरूपाचं भासतं. शिवसेनेच्या पारंपरिक बालेकिल्ल्यांमध्ये भाजपचा प्रभाव वाढवण्यासाठी चव्हाण उपयुक्त ठरू शकतात, असं आकलन पक्ष नेतृत्वाने केलेलं दिसतं. शिंदे गटाच्या तुलनेत भाजपचं अधिक संगठित आणि नियंत्रित नेतृत्व म्हणून त्यांची भूमिका महत्वाची ठरू शकते.

डोंबिवलीसारख्या शहरी भागातून आलेले, कुठलाही राजकीय वारसा नसलेले, पण संघटनेत २३ वर्षे घाम गाळून काम करणाऱ्या चव्हाण यांचा हा प्रवास कार्यकर्ता ते प्रदेशाध्यक्षपदापर्यंतचा ठरला आहे, अत्यंत साधेपणानं वावरणारे, प्रसिद्धीपासून दूर राहणारे चव्हाण याच कारणांमुळे वरिष्ठ नेत्यांचे विश्वासू आहेत. अमित शाह, गडकरी, फडणवीस यांनी जाहीरपणे अनेकदा आपला रवि असा उल्लेख केल्याने त्यांची “आपला रवी” आणि महाराष्ट्रातील ताकदवान नेता म्हणून सर्वदूर ओळख पसरली आहे.

रविंद्र चव्हाण सलग चार वेळा डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले आहेत आणि मागील महायुती सरकारमध्ये लोकनिर्माण मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते जवळचे आणि विश्वासू सहकारी मानले जातात. रविंद्र चव्हाण यांचा राजकीय आणि सामाजिक प्रवास हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेशी घट्ट जोडलेला आहे. त्यांचा भूतकाळ बजरंग दलाशी जोडलेला आहे. डोंबिवलीसारख्या संघाच्या प्रभावाखालील भागातून त्यांनी राजकारणाची सुरुवात केली आणि संघाच्या शिस्त, कार्यपद्धतीचा प्रभाव त्यांच्या नेतृत्वशैलीत स्पष्टपणे दिसून येतो. संघटनात्मक बांधणी, सदस्य नोंदणी आणि पक्षविस्ताराच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी संघाच्या मार्गदर्शनाखाली भूमिका बजावली आहे. पक्षाच्या विविध मोहीमांमध्ये आणि सदस्य नोंदणी अभियानात त्यांना राज्यस्तरीय जबाबदाऱ्या देण्यात आल्या, यामागे त्यांची संघाशी असलेली नाळ आणि निष्ठा हे मुख्य कारण  मानले जात आहे.

२० सप्टेंबर १९७० रोजी जन्मलेले चव्हाण यांनी बी.ए. पर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. २००२ साली भाजप युवा मोर्चाचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. त्यानंतर २००५ मध्ये कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले आणि २००७ मध्ये स्थायी समितीचे सभापती झाले. २००९ मध्ये नव्याने निर्माण झालेल्या डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून ते प्रथमच आमदार म्हणून निवडून आले आणि त्यानंतर सलग चार वेळा विजय मिळवला आहे.

महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री म्हणून त्यांनी अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, माहिती तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण, बंदरे अशा विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या कार्यकाळात ‘आनंदाचा शिधा’, ‘रेशन आपल्या दारी’, ‘शिवभोजन थाळी’ यांसारख्या उपक्रमांची अंमलबजावणी झाली. सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे डिजिटलायझेशन, गरजू आणि तृतीयपंथीयांसाठी शिधापत्रिका, शेतकऱ्यांसाठी थेट रोख हस्तांतरण, तसेच शासकीय गोदामांची उभारणी आणि दुरुस्ती यांसारखी कामे त्यांनी हाती घेतली.

सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्रात पायाभूत सुविधांमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. दोन वर्षांत ९२ हजार कोटींपेक्षा जास्त निधीतून २३ हजार किमीपेक्षा जास्त रस्ते, १०५४ पूल आणि ३३ हजार शासकीय इमारतींचे बांधकाम किंवा नूतनीकरण करण्यात आले. मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामांना गती देण्यासाठी त्यांनी विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधला. कोकणातील रेल्वे स्थानकांचा विमानतळाच्या धर्तीवर विकास, अष्टविनायक यात्रेसाठी रस्त्यांची सुधारणा, तसेच आदिवासी आणि दुर्गम भागातील रस्ते, पूल, बंधारे यांसारख्या पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यात आला.

राजकीय संघटनात्मक कामांतही चव्हाण यांनी मोठी भूमिका बजावली आहे. प्रदेश महामंत्री, कार्यकारी अध्यक्ष, संघटन पर्व प्रभारी अशा विविध पदांवर काम करत असताना त्यांनी दीड लाख सक्रिय सदस्य आणि दीड कोटी प्राथमिक सदस्य नोंदणीसारखी ऐतिहासिक कामगिरी केली. विविध पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. विशेषतः काँग्रेसचे माजी आमदार संग्रामजी थोपटे, शेकापचे माजी आमदार पंडितशेठ पाटील, माजी क्रिकेटपटू केदार जाधव, तसेच इंडिगो एअरलाईन्सचे २ हजारांहून अधिक कर्मचारी आणि २९ हजारांहून अधिक माथाडी कामगार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक, पालघर, सिंधुदुर्ग, रायगड आणि कल्याण लोकसभा लढतीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

डोंबिवली शहराच्या सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातही त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत. ‘डोंबिवलीकर’ मासिकाचे संपादन, सांस्कृतिक उत्सवांचे आयोजन, तरुणांसाठी करिअर मार्गदर्शन, आरोग्यदायी उपक्रम, आणि सामाजिक सलोखा वाढवणारे प्रकल्प हे त्यांच्या कार्याचा भाग राहिले आहेत. सिंधुदुर्गमधील कातकरी कुटुंबांना स्वतःची जमीन दान करून त्यांनी सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घडवले.

रविंद्र चव्हाण यांच्यासमोर भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर तातडीची आणि बहुआयामी आव्हानं उभी आहेत. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विशेषतः मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीसारख्या शहरी भागात भाजपची पकड मजबूत ठेवणे, हे त्यांच्यासाठी प्राथमिक लक्ष असेल. युतीतील सहयोगी पक्षांसोबतचं जागावाटप, रणनीती, आणि प्रसंगी मतभेद यांचा सामना करताना त्यांना समन्वय साधावा लागणार आहे. पक्षाच्या अंतर्गत विरोधकांचा दबाव आणि बंडखोरीचे प्रसंग हाताळणे, तसेच सोशल मीडियावर ट्रोलिंग, डिजिटल नॅरेटिव्ह तयार होणं, आणि प्रतिमानिर्मितीच्या नव्या लढाईत भाजपला आघाडीवर ठेवणे, हीही मोठी आव्हानं त्यांच्यासमोर आहेत. चव्हाण यांचा संघटनात्मक अनुभव, विविध निवडणुकांमधील भूमिका आणि शहरी भागातील सक्रियता या सर्व गोष्टी या आव्हानांना सामोरे जाताना त्यांना उपयोगी ठरणार आहेत.

रविंद्र चव्हाण यांच्या या नियुक्तीमुळे भाजपच्या राज्यातील संघटनात्मक आणि निवडणूक तयारीला नवे बळ मिळेल, असा विश्वास पक्षातून व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचा प्रशासनातील अनुभव, संघटन कौशल्य आणि सर्वसामान्यांशी असलेला संपर्क या सर्व गुणांचा पक्षाच्या आगामी वाटचालीत उपयोग होईल, अशी अपेक्षा आहे.

 

 

follow us