New twist in the Pradeep Purnekar murder case : ठाण्यातील उबाठा पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्येनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री मनोरमा नगर येथील त्यांच्या कार्यालयात घुसून हल्लेखोरांनी गोळीबार करत त्यांची हत्या केली. हल्लेखोरांनी कार्यालयात सात राउंड फायरिंग केली. यापैकी दोन गोळ्या प्रदीप पूर्णेकर यांच्या वर्मी लागल्या. त्यानंतर ते जिवंत राहू नयेत यासाठी त्यांच्यावर कोयत्याने देखील वार करण्यात आले असल्याची माहिती देखील समोर येत आहे. गंभीर जखमी झालेल्या पूर्णेकर यांना कार्यकर्त्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यापूर्वीच त्यांच्या मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं.
या प्रकरणानंतर प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी अनेक गंभीर आरोप करत हत्येमागील सूत्रधारांचा शोध घेण्याची मागणी केली आहे. राम पूर्णेकर यांच्या दाव्यानुसार, ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर त्यांना संशय आहे. काही दिवसांपूर्वी नीलकंठ इमारतीत राजेंद्र शिंदे आणि काही संशयित व्यक्तींची बैठक झाल्याचे त्यांनी सांगितले. गणेश विसर्जनासाठी जात असताना हे सर्वजण एकत्र उभे असल्याचे आपण स्वतः पाहिल्याचा दावा त्यांनी केला.
राम पूर्णेकर म्हणाले की, त्या घटनेनंतर एका व्यक्तीने येऊन आपण प्रदीप पूर्णेकर यांचे मुलगा आहात का, अशी चौकशी केली होती. त्यामुळे काहीतरी कट रचला जात असल्याचा संशय आल्याने आपण वडिलांना त्याबाबत सावध केले होते. त्यावर प्रदीप पूर्णेकर यांनीही रात्री उशिरा बाहेर पडू नकोस, अशी सूचना केली होती. त्यामुळे त्यांनाही आधीपासूनच संभाव्य घातपाताची कल्पना असावी, असा दावा राम पूर्णेकर यांनी केला.
प्रदीप पूर्णेकर हत्येचा थरारक तपशील; एक गोळी मानेतून आरपार, दुसरी छातीत अडकली, इंस्टाग्राम पोस्ट अन् ठाण्यात तणाव
दरम्यान, प्रदीप पूर्णेकर यांचे भाऊ जयनाथ पूर्णेकर आणि मुलगा राम पूर्णेकर यांनी शिंदे सेनेच्या नेत्या मिनाक्षी शिंदे यांच्यावर आणखी काही गंभीर आरोप केले आहेत. राम पूर्णेकर यांनी दावा केला की, काही काळापूर्वी मिनाक्षी शिंदे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्या क्लिपमध्ये प्रदीप पूर्णेकर यांचे नाव घेत निवडणुकांनंतर त्यांना संपवण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला.
याचबरोबर, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पप्या शिंदे या संशयिताबाबतही राम पूर्णेकर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. हल्ल्याच्या वेळी तो कार्यालयात उपस्थित होता, तसेच दोन दिवसांपूर्वीही तो प्रदीप पूर्णेकर यांच्यासोबत दीर्घकाळ चर्चा करत होता, असा दावा त्यांनी केला. गोळीबारानंतर हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केल्याचे तो सांगत असला, तरी त्याला कोणतीही दुखापत झाली नसल्याने संशय अधिक बळावल्याचे राम पूर्णेकर यांनी म्हटले.
प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे निष्पक्ष व सखोल चौकशीची मागणी केली आहे. माझ्या वडिलांनी आयुष्यभर न्यायासाठी काम केले. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी भावनिक प्रतिक्रिया राम पूर्णेकर यांनी व्यक्त केली. दरम्यान, या हत्येप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून विविध आरोपांची पडताळणी केली जात आहे. कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
